मुंबई - शिवसेना प्रवक्ते आणि सामनाचे संपादक संजय राऊत यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत गेल्या वर्षभरात घडलेल्या राजकीय घटना, राज्य आणि देशातील परिस्थिती, शिवसेनेतील फूट आणि निकटवर्तीयांनी सोडलेली साथ यांसह अनेक प्रश्न विचारले. उद्धव ठाकरेंनी त्यांच्या शैलीत या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. माझ्याकडे असताना मी ज्यांना ज्यांना दिलं ते सोडून गेले, पण ज्यांना काहीच दिलं नाही, ते शिवसैनिक सोबत आहेत, असे म्हटले. यादरम्यान, आमदार निलम गोऱ्हे यांनीही साथ सोडल्याचा प्रश्न विचारण्यात आला होता.
राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे उद्धव ठाकरेंनी काही दिवसांपूर्वी विधिमंडळात जाऊन अभिनंदन केले. विशेष म्हणजे, अजित पवारांच्या कामाचं कौतुकही त्यांनी केलं. महाविकास आघाडीतून फुटून ते भाजपासोबत गेले, तरीही उद्धव ठाकरेंनी त्याचं कौतुक करत खास भेट घेतली. त्यामुळे या भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. यासंदर्भात संजय राऊत यांनी सामनाच्या पॉडकास्टमध्ये प्रश्न विचारला होता. तसेच, अजित पवारांसोबत गेलेल्या इतरही मंत्र्यांना का भेटला नाहीत, बाजूलाच निलम गोऱ्हेंचंही केबिन होतं? असा सवाल राऊत यांनी केला. त्यावर, जाऊ द्या.. ना... असे म्हणत उद्धव ठाकरेंनी त्याकडे दुर्लक्ष केलं.
दरम्यान, राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात भाग घेण्यासाठी उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेत हजेरी लावली होती. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरेंना एक चिट्ठी पाठवली. मात्र, ती चिठ्ठी न वाचताच ठाकरे सभागृहाबाहेर पडले. त्यामुळे राजकीय वर्तुळात या चिठ्ठीची चांगलीच चर्चा रंगली होती. त्यात, आता संजय राऊत यांनी विचारलेल्या प्रश्नावरुनही उद्धव ठाकरेंनी जास्त महत्त्व न दिल्याचं दिसून आलं.