मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नेत्या निलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. अलीकडेच आमदार मनिषा कायंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जात आहे. खरं तर गोऱ्हे यांच्या पक्षप्रवेशावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती लक्षणीय होती. विधान परिषदेच्या उपसभापती असलेल्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी बोलताना फडणवीसांनी विरोधकांना टोला लगावला.
शिवसेनेतील पक्षप्रवेशावेळी तुम्ही इथे कसे काय? असा प्रश्न देवेंद्र फडणवीसांना विचारला असता त्यांनी मिश्किलपणे उत्तर दिले. "शिवसेना आणि भाजप ही एक भावनिक युती आहे. निलम ताई आणि आमचे व्यक्तिगत संबंध आहेत म्हणूनच मी त्यांच्या प्रवेशासाठी इथे उपस्थित आहे. त्यांनी दुसऱ्या कोणत्या पक्षात प्रवेश केला नसून हिंदुत्वाला पुढे नेत असलेल्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. तर, आगामी सभापती निवडणुकीवर आम्ही तिन्ही पक्ष एकत्र बसून चर्चा करू", असे फडणवीसांनी सांगितले.
तसेच लोकशाहीसाठी विरोधी पक्ष महत्त्वाचा असून लक्ष विचलित असलेला विरोधी पक्ष असणे ठीक नाही, अशी टीका फडणवीसांनी केली. शरद पवारांबद्दल बोलताना ते म्हणाले की, अजित पवारांनी सांगितल्याप्रमाणे ते देखील सभा घेतील. आमच्या देखील सभांना ३०-४० हजार लोक येत असतात. शरद पवारांना १०० वर्षे आयुष्य लाभावे असे आम्हालाही वाटते. परंतु सहानुभूती मिळवण्यासाठी काही कार्यकर्ते त्यांच्या वयाचा दाखला देत आहेत पण आम्ही त्याकडे लक्ष देत नाही.