अखेर नीलम गोऱ्हेंचा प्रवेश, फडणवीसांची उपस्थिती आश्चर्यकारक; 'या' नेत्याला लगावला टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2023 02:15 PM2023-07-07T14:15:49+5:302023-07-07T14:17:06+5:30
नीलम गोऱ्हे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राज्य सरकारच्या कामाचं कौतुक करत आपण प्रवेश का करत आहोत, हे एका पत्रकातून सांगितलं आहे.
मुंबई – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. अलीकडेच आमदार मनिषा कायंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे ठाकरे गटातील महिला आघाडीतील वाद चव्हाट्यावर आले होते. त्यानंतर आता विधान परिषदेच्या उपसभापती असलेल्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी देखील मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश केला. नीलम गोऱ्हे यांच्या पक्षप्रवेशामुळे उद्धव ठाकरे गटाला जोरदार धक्का बसल्याचे मानले जाते.
नीलम गोऱ्हे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राज्य सरकारच्या कामाचं कौतुक करत आपण प्रवेश का करत आहोत, हे एका पत्रकातून सांगितलं आहे. तसेच, बाळासाहेबांच्या विचारांची भूमिका घेऊन ही शिवसेना पुढे जात असून हीच खरी शिवसेना असल्याचं त्यांनी म्हटलं. तसेच, सुषमा अंधारेंबद्दल प्रश्न विचारला असता, सटरफटर लोकांमुळे पक्षातील नेत्यांमध्ये नाराजी नसते, असेही गोऱ्हे यांनी सांगितले. दरम्यान, नीलम गोऱ्हे यांच्या शिवसेना पक्षप्रवेशावेळी स्वत: देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे आणखी नेते उपस्थित असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
#WATCH | Uddhav Thackeray faction leader Neelam Gorhe joins Maharashtra Chief Minister Eknath Shinde-led Shiv Sena, in Mumbai. pic.twitter.com/QWvFSylafR
— ANI (@ANI) July 7, 2023
गेल्यावर्षी जून महिन्यात एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदारांनी उद्धव ठाकरेंविरोधात भूमिका घेत भाजपाला पाठिंबा दिला. शिवसेनेतील बहुतांश आमदार शिंदेंच्या पाठिशी गेले. जवळपास ४० आमदारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंविरोधात जात एकनाथ शिंदेंच्या पाठिशी उभे राहिले. त्यानंतर राज्यभरात पदाधिकारी आणि शिवसैनिकही शिंदेंसोबत जात होते. त्यावेळी सुषमा अंधारे यांनी उद्धव ठाकरे गटात प्रवेश घेतला. सुषमा अंधारे यांच्या पक्षप्रवेशानंतर ठाकरे गटातील महिला आघाडीत प्रचंड वाद सुरू झाले. सुषमा अंधारेंना दिले जाणारे महत्त्व अनेकांना रुचले नाही. त्यातून नाराज होत अलीकडेच मनिषा कायंदे यांनी शिंदेंच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश केला.