Join us  

‘नीप टाइड’चे दिवस अतिधोक्याचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 2:28 AM

सावधानतेचा इशारा : या काळात पावसाचे पाणी समुद्रात वाहून जाण्यास लागतो वेळ

मुंबई : मोठ्या भरतीच्या दिवशी मुसळधार पाऊस कोसळल्यास मुंबईची तुंबापुरी होते, हा आजपर्यंतचा मुंबईकरांचा अनुभव आहे. मात्र, हेच नव्हे तर ‘नीप टाइड’चे दिवसही मुंबईसाठी धोकादायक ठरू शकतात, हे गेल्या वर्षी दिसून आले. या वर्षी पावसाळ्यात असे सात दिवस आहेत. त्यामुळे मोठ्या भरतीबरोबरच नीप टाइडच्या दिवशीही महापालिकेला डोळ्यात तेल घालून सतर्क राहावे लागणार आहे.मुंबईतील पर्जन्य जलवाहिन्या ताशी सुमारे ५० मि.मी. वेगाने पडणाऱ्या पावसाचे पाणी वाहून नेत आहेत. मात्र, मोठ्या भरतीच्या दिवशी समुद्रात ४.५ मीटर उंचीच्या लाटा उसळतात. अशा वेळी मुसळधार पाऊस कोसळल्यास मुंबईतील सखल भागांमध्ये पाणी तुंबते. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यापूर्वी अशा मोठ्या भरतीच्या दिवसांची यादी तयार करून त्या दिवशी महापालिका किनारपट्टीवर विशेष काळजी घेते. मात्र, गेल्या वर्षी मोठी भरती नसतानाही २९ आॅगस्ट रोजी मुंबईत पाणी तुंबून जनजीवन विस्कळीत झाले होते. याच दिवशी उघड्या मॅनहोलमध्ये पडून बॉम्बे हॉस्पिटलचे पोटविकारतज्ज्ञ डॉ. दीपक अमरापूरकर यांचा मृत्यू झाला. या घटनेचे तीव्र पडसाद उमटून महापालिकेला टीकेचे धनी व्हावे लागले होते.त्या दिवशी समुद्रात नीप टाइड दिवस असल्याने पावसाचे पाणी समुद्रात वाहून जाण्यास वेळ लागला. दिवसभरात ३३३ मि.मी. पाऊस झाल्यामुळे मुंबईची तुंबापुरी झाल्याचे समोर आले होते.तसेच विविध घटनांमध्ये १४ जणांचा मृत्यू तर १२ जण बेपत्ता झाले होते. त्यामुळे या वर्षी मोठ्या भरतीच्या दिवसांबरोबरच नीप टाइडच्या दिवसांचीही यादी तयार करण्यात आली आहे. या दोन्ही भरतीच्या याद्या वाहतूक पोलीस, अग्निशमन दल आणि अन्य प्राधिकरणांना महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने पाठविल्या आहेत. जेणेकरून अशा भरतीच्या दिवशीही मुंबईकर आणि संबंधित यंत्रणा सतर्क राहतील, ज्यामुळेजीवित व वित्तहानी टाळणे शक्य होईल.यंदा ‘नीप टाइड’चे सात दिवसजेव्हा मोठी भरतीही नाही आणि ओहोटीही नसेल - ७ जून, ७ जुलै, १९ आणि २० आॅगस्ट, १७, १८, १९ सप्टेंबर. या वर्षी २४ मोठ्या भरतीचे, तर सात नीप टाइडचे दिवस आहेत. या काळात मुंबईत मुसळधार पाऊस सतत कोसळल्यास पावसाचे पाणी समुद्रात वाहून जाण्याचा मार्ग मंदावतो. यामुळे मुंबईची तुंबापुरी होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :पाऊसमुंबई