मुंबई- माल आयात करताना वापरलेले कंटेनर्स रिकामे झाल्यावर होणारी गर्दी टाळण्यासाठी त्याचप्रमाणे कंटेनर्स हाताळणीचा खर्च कमी करण्यासाठी जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) उबरसारखे तंत्र वापरण्याच्या विचारात आहे. मुंबईत कोस्टा निओक्लासिका या क्रुझवर झालेल्या 10 व्या द्विवार्षिक पोर्टस, शिपिंग अँड लॉजिस्टिक्स परिषदेमध्ये जेएनपीटीचे चेअरमन नीरज बन्सल यांनी याबाबत माहिती दिली. बॉम्बे चेंबर्स ऑफ कॉमर्सतर्फे ही परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळेस बोलताना बन्सल म्हणाले, कंटेनर हलवण्यासाठी, तसेच जेएनपीटीवरील कंटेनरमुळे होणारी गर्दी टाळण्यासाठी आणि खर्चात घट होण्यासाठी उबरसारखे तंत्र वापरण्याचे नियोजन सुरू आहे. सध्या त्याच्या निविदा काढल्या जात असून, 13 कंपन्यांनी त्यामध्ये सहभाग घेतला आहे.मुंबई सध्या आंतरराष्ट्रीय क्रुझ हब म्हणून नावारुपास येत आहे. क्रुझवरील पर्यटक बहुतांश वेळेस ई- व्हिसादवारे येतात. ई व्हिसावर येणा-या पर्यटकांची बायोमेट्रिक चाचणी घेतली जाते. मात्र एका क्रुझवरून 3 ते 4 हजार पर्यटक येतात. एका व्यक्तीच्या बायोमेट्रिक चाचणीस 7 ते 8 मिनिटे लागतात. त्यामुळे सर्व पर्यटकांची चाचणी होण्यास भरपूर वेळ गेला असता. मात्र आता पुढील तीन वर्षांसाठी या चाचणीतून सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई भेटीवर आलेल्या 10व्या आंतरराष्ट्रीय पोर्ट्स, शिपिंग अँड लाँजिस्टिक्स परिषदेत मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय भाटिया यांनी याबाबत माहिती दिली.
बायोमेट्रिक चाचणीतून सवलत देण्याच्या निर्णयामुळे पर्यटन आणि क्रुझसाठी मोठा फायदा होणार आहे. गेल्या आर्थिक वर्षामध्ये 55,000 क्रुझ पर्यटकांनी मुंबईला भेट दिली. भारतात प्रतिवर्षी 40 लाख पर्यटक क्रुझच्या माध्यमातून येऊ शकतात आणि त्यातील 30 लाख पर्यटक फक्त मुंबईत येऊ शकतात, असे अभ्यास अहवालाद्वारे दिसून आले आहे. त्यामुळे क्रुझ पर्यटकांचा वाढता ओघ पाहता मुंबई पोर्ट ट्र्स्टद्वारे विविध योजना पूर्णत्वास नेण्यात येणार आहेत, असेही भाटिया म्हणाले.