मुंबई: जुलै महिना संपला, तरी मुंबई विद्यापीठाचे निकाल जाहीर न झाल्याने, संकटात असलेल्या विद्यापीठावर सोमवारी सकाळी दुसरेच संकट ओढावले. अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. नीरज हातेकर यांनी विद्यापीठाच्या कामकाजाला कंटाळून स्वेच्छानिवृत्ती घेत असल्याची फेसबुकवर पोस्ट टाकली, पण या संदर्भात कोणतीही अधिकृत माहिती विद्यापीठाला नसल्याचे विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या संदर्भात डॉ. हातेकरांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही.जून महिना संपल्यावरही निकाल जाहीर करू न शकल्याने ४ जुलैला राज्यपालांनी विशेष बैठक बोलावली होती. या बैठकीत मुंबई विद्यापीठाला निकाल जाहीर करण्यासाठी ३१ जुलैची डेडलाइन दिली होती. निकाल वेळेत लावण्यासाठी विद्यापीठ प्रशासन कामाला लागले. उत्तरपत्रिका तपासणी, निकालांचे काम सुरळीत पार पडावे, म्हणून प्रा. विनायक दळवी यांची विशेष अधिकारी म्हणून नियुक्ती करण्तात आली. प्रा. दळवी यांनी कामाची सूत्रे हाती घेतल्यावर निकालाच्या कामाला वेग आला. उत्तरपत्रिका तपासणीचा वेग वाढविण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली. यानंतरही काही प्राध्यापक उत्तरपत्रिका तपासणीसाठी येत नसल्याने, कारवाईचा बडगा उचलणार असल्याचे विद्यापीठाने जाहीर केले आणि नव्या वादाला सुरुवात झाली.प्रशासनाबरोबर झालेल्या वादात डॉ. हातेकर यांनी स्वेच्छानिवृत्ती घेण्याचा निर्णय फेसबुक पेजवर जाहीर केला आहे. या पोस्टमध्ये डॉ. हातेकर यांनी विद्यापीठाच्या कामकाजाबाबत नाराजीही व्यक्त केली. हातेकर सरांना पाठिंबा असल्याचे अनेक विद्यार्थी संघटनांनी जाहीर केले, तर काही विद्यार्थी संघटना निर्णय बदलावा, म्हणून त्यांच्याशी चर्चा करणार आहेत.डॉ. हातेकर यांनी विद्यापीठाशी कोणतीही चर्चा केलेली नाही, अथवा कोणतेही अधिकृत पत्र दिलेले नाही. त्यांनी ही पोस्ट फेसबुकवर टाकली आहे. त्यामुळे त्यांच्याशी चर्चा करू, असे विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले.
नीरज हातेकर घेणार स्वेच्छानिवृत्ती : फेसबुकवर केले जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2017 5:21 AM