नीरव मोदी, चोकसीविरुद्ध अटक वॉरंट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 06:22 AM2018-04-09T06:22:46+5:302018-04-09T06:27:29+5:30
पीएनबी घोटाळ्यातील आरोपी नीरव मोदी व मेहुल चोकसीविरोधात सीबीआय कोर्टाने अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आले आहे. चौकशीला हजर राहण्यासंबंधी बजावलेला समन्स या दोघांनीही फेटाळल्यानंतर सीबीआयने कडक पावले उचलली आहेत.
मुंबई : पीएनबी घोटाळ्यातील आरोपी नीरव मोदी व मेहुल चोकसीविरोधात सीबीआय कोर्टाने अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आले आहे. चौकशीला हजर राहण्यासंबंधी बजावलेला समन्स या दोघांनीही फेटाळल्यानंतर सीबीआयने कडक पावले उचलली आहेत.
१३ हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्यात हिरे व्यावसायी नीरव मोदी व त्याचा मामा मेहुल चोकसी प्रमुख आरोपी आहेत. या महाघोटाळ्याची सीबीआयकडून चौकशी सुरू आहे. वॉरंट जारी झाल्याने, आता या दोघांविरुद्ध इंटरपोलकडून ‘रेड कॉर्नर’ नोटीस जारी होण्याचा मार्गही सोपा झाला आहे.
नीरव मोदी आणि मेहुल चोक्सीने पीएनबीच्या मुंबईतील फोर्ट परिसरातील ब्रॅडी हाऊस शाखेतील काही अधिकाऱ्यांना हाताशी घेऊन मोठा घोटाळा केला. बोगस लेटर ऑफ अंडरटेकिंगच्या मदतीने त्यांनी बँकेला तब्बल 13 हजार कोटींना चुना लावला. या प्रकरणाचा तपास ईडी आणि सीबीआयकडून सुरु आहे. सीबीआयने चौकशीसाठी नीरव आणि चोक्सीला नोटीस पाठवली होती. मात्र त्यांनी चौकशीला उपस्थित राहण्यास नकार दिला.
ईडीने नीरव मोदीविरोधात मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयकडून एफआयआर नोंदवण्यात आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. पीएनबी घोटाळा जानेवारी महिन्यात उघडकीस आला. पीएनबीने या घोटाळ्याची तक्रार दिल्यावर तपास यंत्रणांनी मोदी आणि चोक्सीविरोधात कारवाई सुरु केली. ईडीने आतापर्यंत दोघांच्या कोट्यवधींच्या संपत्तीवर टाच आणली आहे. तर सीबीआयने पीएनबीच्या अनेक अधिकाऱ्यांना ताब्यात घेतले आहे.