नीरव मोदी, चोकसीविरुद्ध चौकशीचा फास आवळला; सीबीआय, ईडीची जोरदार कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 06:15 AM2018-02-17T06:15:40+5:302018-02-17T06:15:56+5:30
पंजाब नॅशनल बँकेतील ११,३00 कोटींच्या घोटाळ्यातील आरोपी नीरव मोदी व मेहुल चोकसी यांनी भारतात परत यावे आणि तपास यंत्रणांना सामोरे जावे, यासाठी केंद्र सरकारने त्यांच्याविरुद्ध फास आवळायला सुरुवात केली आहे. दोघांचे पासपोर्ट शुक्रवारी निलंबित करण्यात आले.
नवी दिल्ली/मुंबई : पंजाब नॅशनल बँकेतील ११,३00 कोटींच्या घोटाळ्यातील आरोपी नीरव मोदी व मेहुल चोकसी यांनी भारतात परत यावे आणि तपास यंत्रणांना सामोरे जावे, यासाठी केंद्र सरकारने त्यांच्याविरुद्ध फास आवळायला सुरुवात केली आहे. दोघांचे पासपोर्ट शुक्रवारी निलंबित करण्यात आले.
मोदी व चोकसीच्या शोधासाठी सीबीआयने इंटरपोलशी संपर्क साधला आहे. त्यांच्याविरोधात ‘डिफ्यूजन
नोटीस’ जारी करण्याची विनंती
इंटरपोलला केली आहे. नीरव मोदी १ जानेवारी रोजी तर बेल्जियमचा नागरिक असलेला त्याचा भाऊ निशाल हाही त्याच दिवशी देशातून पळाला. अमेरिकी नागरिक असलेली नीरवची पत्नी ६ जानेवारी
रोजी, तर मेहुल चोकसी ४ जानेवारीला भारतातून पळाले.
सक्तवसुली संचालनालयाने पीएनबी घोटाळ्याची मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यान्वये चौकशी सुरू केली आहे. मोदी व चोकसी यांना एका आठवड्यात हजर होण्याचे आदेश दिले आहेत. दोघांच्या कंपन्यांमधील संचालकांकडे नोटिसा हस्तांतरित केल्या आहेत. सक्तवसुली संचालनालयाने दिवसभर ३५ नवीन ठिकाणी धाडी टाकल्या आहेत, आणखी २९ मालमत्ता शोधून काढल्या आहेत. एकूण ११ राज्यांमध्ये कारवाईचा धडाका सुरु आहे. शुक्रवारी दिवसभर केलेल्या कारवाईत ५४९ कोटींचे सोने आणि दागिने जप्त करण्यात आले आहेत.
आरबीआयने पीएनबीला आदेश दिले की नाही?
बँकेच्या हमीवर अन्य बँकांनी नीरव मोदीला दिलेल्या कर्जाचे पैसे परत करा, असे थेट निर्देश रिझर्व्ह बँकेने पंजाब नॅशनल बँकेला दिल्याचे वृत्त येताच संपूर्ण बँकिंग क्षेत्रात शुक्रवारी सकाळपासून एकच खळबळ उडाली.
पण आम्ही असे आदेश पीएनबीला दिलेले नाहीत, असा खुलासा रिझर्व्ह बँकेने रात्री केला. त्यामुळे हे वृत्त आले कसे, याविषयी उलटसुलट चर्चा सुरू झाली. आरबीआयने भूमिका बदलल्याचेही बोलले गेले.
रिझर्व्ह बँकेच्या अधिकाºयांची आज सकाळी बैठक झाली आणि त्यात पीएनबीच्या कारभाराविषयी तीव्र नापसंती व्यक्त झाली, असेही वृत्त होते.
पण आरबीआयने सगळ्याचाच इन्कार केला. त्यामुळे सकाळच्या बातम्या खोट्या होत्या की आरबीआयने दडपणाखाली भूमिका बदलली, याविषयी रात्री चर्चा सुरू झाली.
‘एलओयू’ २0१७ मधील
पीएनबीतील बहुचर्चित घोटाळा हा २०१०-११ पासून सुरू असल्याचे बोलले जात आहे; पण सीबीआयने दाखल केलेल्या तक्रारीत २०१७ मध्ये हे सारे घडल्याचा उल्लेख आहे. यामुळे बँकेकडून देण्यात आलेले सर्व ‘एलओयू’ गेल्या वर्षीचे असल्याचे स्पष्ट होत आहे.
म्युच्युअल फंड्सवर परिणाम
पंजाब नॅशनल बँकेचा घोटाळा बाहेर आल्यानंतर बँकेच्या शेअर्समध्ये दोन दिवसांत २०%हून अधिक घट झाली. याच शेअर्समध्ये म्युच्युअल फंडांनीही अर्थात सर्वसामान्यांनी २४५६ कोटी रुपये गुंतवून ठेवले आहेत.
सीबीआय व ईडीची आतापर्यंतची कारवाई
११ राज्यांमध्ये तपास
१०५ बँक खाती सील
५० ठिकाणी छापे
२६ जागी धाडी
२१ खाती ईडीकडून सील
५४९ कोटींचे सोने,
दागिने दिवसभरात जप्त
संबंधित बँकांच्या विदेशातील खात्यांचे व्यवहार थांबवले
150‘एलओयू’ सापडले