नवी दिल्ली : नीट आणि जेईई परिक्षेसाठी विद्यार्थी मुंबईमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या लोकलने प्रवास करू शकणार आहेत. याबाबतचा निर्णय केंद्रीय गृह मंत्रालयाद्वारे घेण्यात आला आहे.
मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या लोकल सेवेद्वारे परिक्षार्थी नियोजित केंद्रांवर जाऊ शकणार आहेत. याबाबतची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्राद्वारे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली होती. यानंतर गृह मंत्रालयाने ही परवानगी दिली आहे.
लोकलमधून प्रवास करण्यासाठी या विद्यार्थ्यांना परिक्षेचे प्रवेशपत्र दाखवावे लागणार आहे. यानंतर त्यांना स्थानकांमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. या विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांसोबत परिक्षेच्या दिवशी लोकलमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. यासाठी अतिरिक्त बुकिंग काऊंटर सुरु करण्यात येणार आहेत.
प्रवासाच्या काळात विद्यार्थी, पालकांनी सोशल डिस्टन्स पाळणे बंधनकारक आहे. तसेच यासाठी स्टेशनवर गर्दीदेखील टाळावी असे रेल्वेने काढलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.