Join us

नीट-पीजीची २०० प्रश्नांची परीक्षा आता विभागनिहाय; प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र वेळ

By रेश्मा शिवडेकर | Published: May 05, 2024 4:14 PM

प्रत्येक विभागाकरिता स्वतंत्र वेळ दिला जाईल.

रेश्मा शिवडेकर,लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई, वैद्यकीयच्या पदव्युत्तर अभ्याक्रमांच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या नीट-पीजी या सामाईक प्रवेश परीक्षेला दोन महिनेही नसताना या परीक्षेच्या रचनेत महत्त्वपूर्ण बदल करण्यात येणार आहेत. जून महिन्यात ही परीक्षा होऊ घातली आहे. ऐन वेळेस परीक्षेच्या रचनेत बदल कऱण्यात आल्याने विद्यार्थी नाराजी व्यक्त करत आहेत.

ही परीक्षा घेणाऱया दि नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्सने (एनबीए) याबाबत माहिती देताना आता ही परीक्षा दोन वेगळ्या भागात विभाजित करण्यात येत असल्याचे जाहिर केले आहे. प्रत्येक विभागाकरिता स्वतंत्र वेळ दिला जाईल.

आधी नीट-पीजीचे २०० प्रश्न सोडविण्याकरिता एकत्रितपणे १८० मिनिटे दिली जात. आता  प्रत्येक विभागातील प्रश्नांची संख्या आणि स्वरूपानुसार वेळ ठरवून दिली जाणार आहे. हे बदल २०२४पासून होणाऱया नीट-पीजीपासूनच लागू केले जाणार आहेत. ही संगणकाधारित असेल. परीक्षेत गैरप्रकार होऊ नये म्हणून हे बदल करण्यात आल्याची माहिती एनबीएने दिली.

होणार काय?

पहिल्या विभागाकरिता दिला गेलेला कालावधी संपेपर्यंत विद्यार्थ्यांना दुसऱा विभाग सोडविता येणार नाही.-पुढील विभागाची वेळ सुरू झाल्यानंतर मागील विभागातील प्रश्न सोडविता वा दुरूस्त करता येणार नाहीत. परंतु दिलेली वेळ संपेपर्यंत सोडविलेल्या प्रश्नाचे पुनरावलोकन करता येईल.

किमान मॉक टेस्ट तरी घ्यावी

जून महिन्यात नीट-पीजीचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र अवघा दीड महिना असताना हा बदल करण्यात आल्याने विद्यार्थी नाराजी व्यक्त करत आहेत. एनबीएने किमान विद्यार्थ्यांना मॉक टेस्टची सोय उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून परीक्षेच्या रचनेबाबत स्पष्टता येईल, अशी मागणी पालकांनी केली.

या परीक्षांमध्ये बदल

नीट-पीजी, नीट-एमडीएस, नीट-एसएस, एफएमजीई, डीएनबी-पीडीसीईटी, जीपॅट, डीपीईई, एफडीएसटी, एफईटी, एनबीईएमएस.

 

टॅग्स :शिक्षण