मुंबई - ग्रेसमार्कच्या निर्णयामुळे यंदा वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशाकरिता देशस्तरावर घेण्यात आलेली नीट-युजी ही सामाईक प्रवेश परीक्षा वादाच्या भोवऱयात सापडली आहे. त्यात तब्बल ६७ विद्यार्थ्यांना ९९.९९ पर्सेंटाईल (७२० पैकी ७२० गुण) मिळाल्याने यंदा प्रवेशाचा कटऑफ चढा राहण्याच्या चर्चेने विद्यार्थी-पालकांच्या चिंतेत भर पडली आहे. काही पालकांनी याविरोधात सुप्रीम कोर्टात जाण्याची तयारी केली आहे.
नॅशनल टेस्टींग एजन्सीकडून (एनटीए) मंगळवारी नीट-यूजीचा निकाल जाहीर कऱण्यात आला. यंदाचा खुल्या गटाचा कटऑफ ७२०-१३७ वरून ७२०-१६४ असा वाढला आहे. त्यात मिळालेल्या गुणांच्या तुलनेत देण्यात आलेल्या रँकमध्ये मोठा फरक असल्याने विद्यार्थी-पालक चक्रावून गेले आहेत. विद्यार्थ्यांना ९९.९६ पर्सेंटाईल मिळूनही ४५३ वा रँक मिळाल्याने अनेक मोठ्या कॉलेजात प्रवेश मिळविणे विद्यार्थ्यांना दुरापास्त होणार आहे. अवघ्या २० गुणांच्या फरकामुळे विद्यार्थ्यांचा रँक दोन हजाराने खाली आल्याचे दिसून येत आहे. उदाहरणार्थ ७२० पैकी ७०० गुण मिळालेल्या विद्यार्थ्याला थेट १,९९३वा रँक मिळाला आहे. तर ६३५ गुण मिळविलेल्या विद्यार्थ्याचा रँक आहे, ४२,८९८. देशात एमबीबीएसच्या मर्यादीत जागा असताना चांगले गुण मिळवूनही रँक घसरल्याने चांगल्या संस्थेत प्रवेश मिळविणे दुरापास्त होणार आहे. अंतिम उत्तरसूची जाहीर केल्यानंतर अवघ्या दुसऱया दिवशी नीट-युजीचा निकाल जाहीर करण्यात आला. त्याबाबतही शंका व्यक्त होत आहे.
१३ लाख प्रवेश पात्र
देशभरातून २४ लाखांच्या आसपास विद्यार्थ्यांनी नीट-यूजी दिली होती. त्यापैकी ५,४७,०३६ विद्यार्थी आणि ७,६९,२२२ विद्यार्थिनी वैद्यकीय प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत. यातील खुल्या गटातून ३,३३,९३२, ओबीसीतून ६,१८,८९०, एससीतून १,७८,७३८, एसटीतून ६८,४७९ आणि इडब्ल्यूएसमधून १,१६,२२९ विद्यार्थी पात्र ठरले आहेत.
ग्रेस मार्कचा निर्णय वादात
परीक्षेदरम्यान ज्या विद्यार्थ्यांना काही कारणांमुळे वेळ कमी मिळाला त्यांना सुप्रीम कोर्टाच्या निकालानुसार नॉर्मलायझेशनच्या सूत्राच्या आधारे ग्रेस मार्क देण्यात आल्याचे एनटीएने जाहीर केले आहे. त्यावर अनेक विद्यार्थ्यांनी आक्षेप नोंदविला आहे. ग्रेस मार्क दिलेल्या विद्यार्थ्यांना ७१८ किंवा ७१९ गुणही मिळालेले असू शकतात, असे एनटीएने स्पष्ट केले आहे. परंतु, ग्रेस मार्क देण्याचा तुमचा फॉर्म्युला काय आहे, याबाबत स्पष्टता द्या, मागणी विद्यार्थी करत आहेत. काही पालकांनी या निकालाला न्यायालयात आव्हान देण्याची तयारी केली आहे.
राज्यनिहाय निवड झालेले विद्यार्थी
उत्तर प्रदेश - १६५०४७
महाराष्ट्र - १४२६६५
राजस्थान - १२१२४०
तामिळनाडू - ८९४२६
कर्नाटक - ८९०८८
केरळ - ८६६८१
बिहार - ७४७४३
प.बंगाल - ६३१३५
मध्य प्रदेश - ६००७३
गुजरात - ५७१९७
तेलंगणा - ४७३७१
दिल्ली - ४६७९४
आंध्र - ४३८५८