नीट-यूजी फेरपरीक्षा? विद्यार्थी अस्वस्थ, वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांच्या विधानाने गोंधळाचे वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2024 08:32 AM2024-06-10T08:32:57+5:302024-06-10T08:33:35+5:30

NEET-UG Exam: नीट-यूजीच्या सदोष निकालामुळे हवालदिल झालेल्या विद्यार्थी-पालकांना दिलासा देण्याऐवजी ही परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी करून राज्याच्या वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी विद्यार्थी-पालकांच्या अस्वस्थतेत भर घातली आहे.

NEET-UG Re-Exam? Students upset, atmosphere of confusion with the statement of the Minister of Medical Education | नीट-यूजी फेरपरीक्षा? विद्यार्थी अस्वस्थ, वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांच्या विधानाने गोंधळाचे वातावरण

नीट-यूजी फेरपरीक्षा? विद्यार्थी अस्वस्थ, वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांच्या विधानाने गोंधळाचे वातावरण

 मुंबई - नीट-यूजीच्या सदोष निकालामुळे हवालदिल झालेल्या विद्यार्थी-पालकांना दिलासा देण्याऐवजी ही परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी करून राज्याच्या वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी विद्यार्थी-पालकांच्या अस्वस्थतेत भर घातली आहे. या गोंधळाबाबत मुश्रीफ यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी, तूर्तास तरी पालकांच्या तक्रारीवरून एनटीए आणि केंद्र सरकारकडे चौकशीची मागणी केल्याची माहिती दिली.

नीट-यूजीच्या सदोष निकालांवरून देशभरात विद्यार्थी-पालकांकडून रोष व्यक्त होत आहे. या निकालामुळे हजारो विद्यार्थ्यांच्या नीट-यूजीच्या रँकमध्ये ३० ते ४० हजाराचा फरक पडल्याची तक्रार आहे. मात्र, नीट घेणाऱ्या नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) या केंद्रीय यंत्रणेकडून याची दखल घेतली न गेल्याने ५० ते ६० हतबल विद्यार्थी-पालकांनी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांची शुक्रवारी भेट घेऊन राज्यातील विद्यार्थ्यांना दिलासा देण्याची मागणी केली.

ग्रेस मार्कांमुळे कटऑफ वाढला असून, याचा परिणाम राज्यातील वैद्यकीय प्रवेशांवर होणार आहे. त्यामुळे नीट-यूजीच्या निकालाची त्रयस्थ यंत्रणेकडून चौकशी करण्यात यावी, ग्रेस मार्क रद्द करून सुधारित निकाल जाहीर करण्यात यावा व तोपर्यंत राज्यातील प्रवेश प्रक्रिया स्थगित ठेवण्यात यावी, अशा मागण्यांचे निवेदन पालकांकडून मंत्र्यांना देण्यात आले. यात नीट-यूजीच्या फेरपरीक्षेचा बिलकूल उल्लेख नव्हता. तरीही पालकांचे म्हणणे समजून न घेता प्रसारमाध्यमांकडे प्रतिक्रिया देताना ही परीक्षाच पुन्हा घेण्याची मागणी नॅशनल टेस्टिंग एजन्सी आणि केंद्र सरकारकडे करू, असे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटल्याने पालकांच्या अस्वस्थतेत भर पडली आहे.

मंत्र्यांनी आम्हाला अवघी १० मिनिटे दिली. बाहेर येऊन प्रसारमाध्यमांना दिलेली प्रतिक्रिया पाहता, त्यांना आमचे म्हणणे कितपत समजले असावे, याबाबत शंकाच आहे, अशी प्रतिक्रिया पालकांच्या शिष्टमंडळातील एका पालकाने नाव न छापण्याच्या अटीवर दिली. 

‘प्रकरणाचा तपास करणार’
 याप्रकरणी हसन मुश्रीफ यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी पालकांच्या तक्रारी केंद्र सरकार आणि एनटीएपर्यंत पोहोचविल्याची माहिती ‘लोकमत’ला दिली. 
 आपण फेरपरीक्षेची मागणी केली आहे का, असे विचारले असता ते म्हणाले, या प्रकाराची आधी चौकशी करावी लागेल. पालक म्हणतात त्याप्रमाणे गैरप्रकार झाला आहे का, हे तपासावे लागेल. त्याप्रमाणे पुढील दिशा ठरवावी लागेल, असे उत्तर त्यांनी दिले. 

हा घोळ ग्रेसमार्क दिल्यामुळे झाला आहे. अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय प्रवेश परीक्षांमध्ये ग्रेसमार्क देण्याबाबत सुप्रीम कोर्टाचा कुठलाही आदेश नसताना एनटीएने १६०० विद्यार्थ्यांना ग्रेसमार्क दिले आहेत. ते रद्द करून, विद्यार्थ्यांच्या ओएमआरची पुन्हा तपासणी करून सुधारित निकाल लावण्यात यावा, इतकीच आमची मागणी आहे. आम्हाला फेरपरीक्षेला नको आहे.
-डॉ. प्रीती व्यास, पालक 

 ‘नीट’च्या निकालाची निष्पक्ष समितीकडून चौकशी करण्यात यावी आणि तोपर्यंत राज्यातील प्रवेश प्रक्रिया स्थगित ठेवण्यात यावी, अशी मागणी आम्ही केली होती. फेरपरीक्षा हा यावरचा उपाय नाही; पण या सगळ्या प्रकारात बळी पडलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षेला सामोरे जायला लावून त्यांच्या त्रासात भर टाकू नये.
-डॉ. गीतांजली बोरकर, पालक


दोन वर्षे नीटच्या तयारीसाठी अभ्यास केल्यानंतर 
आता पुन्हा या परीक्षेला सामोरे जाण्याची विद्यार्थ्यांची तयारी नाही. परीक्षेनंतर डिसेंबर उजाडेल. 
यात विद्यार्थ्यांचे आणखी नुकसान होणार आहे.
-संदेश सावंत, पालक

Web Title: NEET-UG Re-Exam? Students upset, atmosphere of confusion with the statement of the Minister of Medical Education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.