Join us  

नेत्याविना विरोधी बाक सुनासुना...

By admin | Published: March 29, 2017 6:10 AM

शिवसेना-भाजपातील विकोपाच्या वादावादीनंतरही महापौर, स्थायी समिती अध्यक्षपदाचा तिढा सुटला. सर्व वैधानिक व विशेष

मुंबई : शिवसेना-भाजपातील विकोपाच्या वादावादीनंतरही महापौर, स्थायी समिती अध्यक्षपदाचा तिढा सुटला. सर्व वैधानिक व विशेष समिती अध्यक्षांची निवड झाली. तुटलेल्या युतीमधील ‘अंडरस्टँडिंग’ने प्रभाग समित्यांच्या निवडणुकाही गुण्यागोविंदाने पार पडल्या. तरीही विरोधी नेत्याचा प्रश्न काही सुटत नसल्याने महापालिकेतील विरोधी बाक सुनासुनाच असल्याचे चित्र आहे.मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष ठरल्यानंतरही विरोधकांच्या बाकावर बसण्यास भाजपाने नकार दिला आहे. ही संधी साधून निवडणुकीनंतर एकट्या पडलेल्या काँग्रेसने विरोधी पक्षनेते पदावर दावा केला. परंतु भाजपा आपण हक्क सोडत असल्याचे लिहून देत नसल्याने तिढा अद्यापही कायम आहे. अशा परिस्थितीत काय करायचे, याबाबत विधी खात्याचे मत मागविण्यात आले आहे.हे मत आल्यानंतर महापौर विरोधी पक्षनेते पदाचे भवितव्य ठरविणार आहेत. परंतु महापालिकेच्या तीन महासभा झाल्या तरी अद्याप विरोधी बाकाला नेतृत्व मिळालेले नाही. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी, एमआयएम, मनसे अद्याप संभ्रमात आहे. तर विरोधी बाकावर बसण्यास नकार देऊनही भाजपा विरोधकांची भूमिका मात्र बरोबर वठवत आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेते पदाचा प्रश्न सोडविण्यास सत्ताधारी उत्सुक नसल्याचे स्पष्ट होत आहे. (प्रतिनिधी)महापौरांवर भाजपाचा दबावविधी खात्याचे मत मागविल्यानंतर महापालिकेच्या तीन सभा झाल्या. मात्र अद्याप मत काही येत नाही आणि महापौरांचा निर्णय होत नाही. त्यामुळे यामागे काही तरी काळेबेरे असल्याचा संशय काँग्रेसचे गटनेते रवी राजा यांनी व्यक्त केला आहे. महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्यावर भाजपाचा दबाव असल्याने विरोधी पक्षनेते पदाबाबत अद्याप निर्णय घेण्यात येत नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.काँग्रेसचा युक्तिवाद : महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुकीमध्ये शिवसेना उमेदवारांना भाजपाने मतदान केल्याने पालिका कायदा १८८८ कलम ३७-१ अ मधील नियमानुसार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष हाच संख्याबळानुसार विरोधी पक्ष ठरतो, असा दावा काँग्रेसने केला आहे. काँग्रेस पक्षाचे ३१ नगरसेवक निवडून आले आहेत. त्यांचा गटनेता हाच विरोधी पक्षनेता ठरतो, असा युक्तिवाद काँग्रेसचे गटनेते रवी राजा यांनी चिटणीस खात्याला पाठविलेल्या पत्रातून मांडला आहे.