योग्य सवयींकडे मधुमेहींचे दुर्लक्ष
By admin | Published: November 12, 2015 12:25 AM2015-11-12T00:25:01+5:302015-11-12T00:25:01+5:30
मधुमेह झाल्यावर खाण्याची पथ्ये पाळणे आवश्यक असते. औषध आणि पथ्यामुळे मधुमेह नियंत्रणात राहण्यास मदत होते
मुंबई : मधुमेह झाल्यावर खाण्याची पथ्ये पाळणे आवश्यक असते. औषध आणि पथ्यामुळे मधुमेह नियंत्रणात राहण्यास मदत होते. पण एका सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की, मधुमेही खाण्याच्या सवयींकडे दुर्लक्ष करतात. या दुर्लक्षामुळेच मधुमेहींना त्रास होतो, असे तज्ज्ञ डॉक्टरांचे मत आहे.
३६ ते ६५ वयोगटातील ४ हजार मधुमेहींचा अभ्यास करण्यात आला. कोलकाता, हैदराबाद, मुंबई या शहरांमध्ये सर्वेक्षण करण्यात आले होते. या सर्वेक्षणात असे आढळून आले की, १० पैकी ७ मधुमेही हे आपण काय खातो, किती खातो याकडे अजिबात लक्ष देत नाहीत. मधुमेहींच्या आहारात सरासरी ६८ टक्के कर्बोदके असल्याचे आढळून आले आहे. हे प्रमाण अधिक आहे.
शहरी भागातील बहुतांश व्यक्तींची जीवनशैली ही बैठी स्वरूपाची बनली आहे. कामाचे तास वाढल्याने या व्यक्ती व्यायाम करत नाहीत. त्याचबरोबर आहारातदेखील बदल झाले आहेत. मधुमेहींच्या आहारात कॅलरीजचे प्रमाण वाढले आहे. पुरुष २ हजार ५३४ किलो कॅलरी तर महिला २ हजार ६३४ किलो कॅलरीजचे सेवन करतात. हे प्रमाण मधुमेहींना घातक असल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे.
मधुमेहींपैकी ८० टक्के जण दररोज ३ ते ४ वेळा खातात. पण दोन खाण्यातील वेळा साडेचार तासांपासून ते सात तास इतकी असते. दोन खाण्यांमधील हे अंतर खूप जास्त आहे. एवढा वेळ उपाशी राहिल्याने मधुमेहींना त्रास होण्याचीच शक्यता असते. मधुमेहींसाठी सर्वांत मोठे आव्हान म्हणजे दोन खाण्यातील अंतर हेच आहे. सकाळी उठणे आणि ब्रेकफास्ट करणे यात ३ ते ४ तासांचा फरक असतो. ही तफावत कमी झाली पाहिजे. मधुमेहींना योग्य नाश्ता करावा, असे डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले.
सण-उत्सवाच्या दिवशी मधुमेही गोड पदार्थ, भाताचे सेवन करतात. सर्वेक्षणात असे आढळून आले की, ३० टक्के जण या काळात आहारातील नियम शिथिल करतात. पण हे चुकीचे आहे. मधुमेहींनी आहाराचे नियोजन करणे अत्यंत गरजेचे आहे. या नियोजनावरच मधुमेहाचे नियंत्रण अवलंबून असते. (प्रतिनिधी)