मुंबई: गोवंडी-बैंगणवाडीतील देवनार एफ ब्लॉक रस्त्याला लागून असलेल्या संंत रोहिदास उद्यान आणि अॅटलांटा उद्यानाकडे पालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने स्थानिक नागरिक प्रशासनावर नाराज असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या दोन्ही उद्यानांची नीट देखभाल केली जात नसल्याचे नागरिकांनी सांगितले. उद्यानांमध्ये सोयींचा अभाव असल्याचे उद्यानात खेळण्यासाठी येणाऱ्या मुलांनी सांगितले.संत रोहिदास उद्यानाचे प्रवेशद्वार तुटल्याचे पाहायला मिळत आहे. जुन्या, तुटलेल्या, खराब झालेल्या खेळण्यांचे साहित्य गेल्या कित्येक दिवसांपासून उद्यानामध्ये पडून आहे. उद्यानामध्ये वीजसुद्धा नाही. अशा सुविधांच्या अभावामुळे स्थानिक नागरिक पालिका प्रशासनावर नाराज आहेत. अॅटलांटा उद्यानाची अवस्था संत रोहिदास उद्यानाहूनही वाईट असल्याचे दिसून येत आहे. सायंकाळच्या वेळेस उद्यानामध्ये प्रेमी युगुले आणि जुगारी असतात, त्यांच्यावर त्यांना आळा घालावा, अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहे. उद्यानामधील लहान मुलांचे खेळाचे साहित्य खराब झाले आहे. उद्यानामधील झोपाळ्यांची दुरावस्था झाल्याचे पाहायला मिळत आहे.दोन वर्षांपूर्वी उद्यान बांधताना उद्यानामध्ये प्रसाधनगृह आणि पहारेकऱ्यासाठी स्वतंत्र खोलीची व्यवस्था करण्यात आली होती. परंतु आता त्याचे खंडर झाले आहे. त्याची दुरूस्ती करून उद्यानामध्ये पहारेकरी नेमावा, अशी मागणी नागरिक करत आहेत. (प्रतिनिधी)उद्यानामध्ये वीजेची सोय नाही. वीज नसल्यामुळे उद्यानातील झाडांना दररोज पाणी घालता येत नाही. उद्यानामधील जी खेळणी खराब झाली आहेत. उद्यानाच्या कोपऱ्यात खेळण्यांचा ढीग साचला आहे. परंतु वारंवार तक्रार करूनही ते साहित्य उचलले जात नाही. प्रशासनाकडे मागणी करूनही उद्यानामध्ये वीजेची सोय केली जात नाही.-दगडू अस्वले, संत रोहिदास उद्यानाचे पहारेकरीउद्यानात लहान मुलांसाठी वेगळी जागा आहे. परंतु उद्यानामध्ये मोठी मुले जेव्हा क्रिकेट खेळतात. तेव्हा लहान मुलांना त्यांचा चेंडू लागल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यासाठी संरक्षक भिंत बांधण्याची गरज आहे. -सीमा गोसावी, स्थानिक रहिवासी
बैंगणवाडीतील उद्याने दुर्लक्षित
By admin | Published: April 20, 2017 3:15 AM