‘निष्काळजी’ डॉक्टर दाम्पत्याचा अटकपूर्व जामीन फेटाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 01:55 AM2018-07-27T01:55:13+5:302018-07-27T01:55:38+5:30

रत्नागिरीचे प्रकरण : प्रसूतीनंतर सहाव्या दिवशी महिलेचा मृत्यू

'Negligence' Doctor rejected anticipatory bail | ‘निष्काळजी’ डॉक्टर दाम्पत्याचा अटकपूर्व जामीन फेटाळला

‘निष्काळजी’ डॉक्टर दाम्पत्याचा अटकपूर्व जामीन फेटाळला

Next

मुंबई : रुग्णाची तपासणी करून त्याच्या आजाराचे निदान न करताच परस्पर टेलिफोनवर सांगितलेली औषधे दिलेल्या रुग्णाचा नंतर मृत्यू होणे हा सदोष मनुष्यवध ठरतो, असे नमूद करून मुंबई उच्च न्यायालायाने रत्नागिरी येथील दीपा व संजीव पावसकर या डॉक्टर दाम्पत्याचा अटकपूर्व जामीन फेटाळला.
स्त्रीरोगशास्त्रात ‘एम.डी.’ असलेल्या या डॉक्टर दाम्पत्याच्या इस्पितळात ज्ञानदा प्रणव पोळेकर या महिलेची यंदाच्या ६ फेब्रुवारी रोजी सिझेरियन शस्त्रक्रियेने प्रसूती झाली. ९ फेब्रुवारी रोजी ज्ञानदा यांना इस्पितळातून घरी सोडण्यात आले. लगेच दुसऱ्या दिवशी प्रकृती बिघडल्याने त्यांना पुन्हा इस्पितळात आणण्यात आले, पण ११ फेब्रुवारीला त्यांचा मृत्यू झाला.
प्रणव पोळेकर यांनी फिर्याद नोंदविल्यावर रत्नागिरी पोलिसांनी सर्व केस पेपर सिव्हिल सर्जनकडे सोपवून त्यांचे मत घेतले. त्यांनी नेमलेल्या ‘मेडिकल बोर्ड’ने पावसकर डॉक्टर दाम्पत्यावर निष्काळजीपणाचा ठपका ठेवल्यावर पोलिसांनी त्यांच्यावर भादवि कलम ३०४ अन्वये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविला.
अटकपूर्व जामिनासाठी युक्तिवाद करताना पावसकर डॉक्टर दाम्पत्यातर्फे शिरीष गुप्ते व अशोक मुंदरगी या ज्येष्ठ वकिलांनी असा युक्तिवाद केला की, फार तर हे प्रकरण भादंवि कलम ३०४ए अन्वये निष्काळजीपणाने मृत्यूच्या व्याख्येत बसू शकेल. हा निष्काळजीपणा गुन्हेगारी स्वरूपाचा नाही व त्यातून उद््भवणारी जबाबदारी दिवाणी स्वरूपाची असून भरपाईने तिची पूर्तता होऊ शकेल. दीपक ठाकरे व वीरा शिंदे या सहाय्यक पब्लिक प्रॉसिक्युटरनी यास विरोध करून पोलिसांनी केलेल्या कारवाईचे समर्थन केले.
न्या. साधना जाधव यांनी प्रकरणातील तथ्यांचा सविस्तर उहापोह करून असा स्पष्ट निष्कर्ष नोंदविला की, तपासणी करून रोगनिदान न करताच औषधोपचार करून त्यातून रुग्णाचा मृत्यू होणे हा डॉक्टरांकडून झालेला गुन्हेगारी स्वरूपाचा निष्काळजीपणाच ठरतो. वैद्यक व्यवसायावरील विश्वास व आदर कायम राखण्यासाठी अशा निष्काळजी व बेजबाबदार डॉक्टरना दूर ठेवणे गरजेचे आहे, असेही न्यायमूर्तींनी म्हटले. एवढेच नव्हे तर रत्नागिरी शहरातील सर्व डॉक्टर या चुकार डॉक्टरांच्या पाठीशी उभे राहिले व त्यांनी दोन दिवस व्यवसाय बंद ठेवून रुग्णांना वेठीस धरले, याबद्दलही न्यायालायने तीव्र नाराजी नोंदविली.
या डॉक्टर दाम्पत्यावर ठपका ठेवताना न्यायमूर्तींनी म्हटले की, ज्ञानदाला घरी सोडले तेव्हा तिची तपासमी करायला कोणीच नव्हते. पावसकर डॉक्टर पती-पत्नी आधीच पुण्याला निघून गेले होते व त्यांनी ज्ञानदाचे पुढच्या तारखेचे ‘डिस्चार्ज कार्ड’ आधीच तयार करून ठेवले होते. दुसºया दिवशी ज्ञानदाला पुन्हा इस्पितळात आणले तेव्हा डॉक्टर दाम्पत्याने डॉक्टर दाम्पत्याने मेडिकल स्टोअरवाल्यास फोनवरून सांगून ज्ञानदाला औषधे दिली. पुढील दोन दिवस ज्ञानदाची प्रकृती अधिकच खालावत गेली तरी इस्पितळात इयत्ता १० व १२ वी उत्तीर्ण नर्सखेरिज लक्ष द्यायला कोणी नव्हते. या नर्स पावसकर डॉक्टरना फोन करून काय करायचे ते विचारत होत्या. ज्ञानदाला दुसरीकडे हलविण्याचा विषय तिच्या कुटुंबियांनी अनेकदा काढला, पण ‘हातचा पेशन्ट दुसरीकडे जाऊ न देण्याच्या व्यावसायिक हेतूने’ त्यास नकार दिला गेला व ज्ञानदाला बरे वाटेल, एक दिवसात तिला घरी पाठवू, असे सांगितले गेले.

जिवाची भरपाई कशी होणार?
न्यायालयाने म्हटले की, डॉक्टरने रुग्णास तपासून त्यांचे रोगनिदान चुकले तर तो साधा निष्काळजीपणा म्हणता येईल. पण रुग्णाला न तपासताच त्याला औषधे देणे ही तद्दन गुन्हेगारी हेळसांड ठरते. प्रस्तूत प्रकरणात या निष्काळजीपणाने सहा दिवसांच्या एका तान्ह्या बाळाने आई व पतीने पत्नी गमावली त्याची भरपाई पैशाने कशी होणार?

Web Title: 'Negligence' Doctor rejected anticipatory bail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.