निष्काळजीपणामुळे शिरले बोटीत पाणी; मालकाला दंड ठोठावणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2020 05:09 AM2020-01-18T05:09:35+5:302020-01-18T05:09:45+5:30
परवानगी प्रक्रिया अधिक कडक करणार; गेटवे ऑफ इंडियाजवळ पार्टी करताना बोटीत पाणी भरल्याचे प्रकरण
मुंबई : जानेवारीच्या पहिल्या रविवारी गेटवे ऑफ इंडियाजवळील समुद्रात पार्टी करताना छोट्या बोटीमध्ये (कॅटमरान) पाणी भरल्याने ही बोट बुडू लागली होती. या प्रकरणी केलेल्या चौकशीत बोटीच्या खालील भागातील छिद्रातून पाणी आत शिरल्याचे प्राथमिक तपासणी अहवालात समोर आले आहे. मुंबई पोर्ट ट्रस्टने या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून संबंधित मालकाला आर्थिक दंड ठोठावण्यात येणार आहे.
असे प्रकार भविष्यात घडू नयेत व प्रवासी, बोटीवरील कर्मचाऱ्यांच्या जीवाशी खेळ होऊ नये याची काळजी घेण्यात येणार आहे. त्यासाठी सध्या अस्तित्वात असलेला आर्थिक दंड नगण्य असल्याने त्याच्या प्रमाणात वाढ करण्याचा विचार केला जात असल्याची माहिती पोर्ट ट्रस्टच्या अधिकाऱ्यांनी दिली. मुंबईत समुद्रात बोटींंवर पार्टी करण्याचे प्रमाण वाढीस लागले असून भविष्यात असे प्रकार घडू नयेत यासाठी मुंबई पोर्ट ट्रस्टने नियम अधिक कठोर करण्याचा विचार सुरू केला आहे. मुंबई बंदराच्या हद्दीत असलेल्या सर्व बोटींचे पुन्हा नव्याने सर्वेक्षण करून ज्या बोटींमध्ये त्रुटी आढळतील त्या दूर केल्याशिवाय प्रमाणपत्र दिले जाणार नाही. बोटीत एखादी त्रुटी राहिल्यास त्याचा फटका प्रवाशांसोबत त्या बोटीवरील कर्मचाºयांनादेखील बसण्याची भीती असते. त्यामुळे बोटीच्या सुरक्षिततेकडे जास्त लक्ष देण्यात येत आहे. सदर दुर्घटनाग्रस्त बोट दुरुस्तीसाठी मालकाने मोरा येथे पाठविले असून दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर नव्याने सर्वेक्षण केले जाईल.
मुंबई बंदराच्या हद्दीत बोटी उभी करण्यासाठी, प्रवास करण्यासाठी मुंबई पोर्ट ट्रस्टच्या मरिन विभागातर्फे जहाजांना प्लार्इंग परवाना दिला जातो. त्यासाठी संबंधित बोटीमालकाकडून सर्व्हे प्रमाणपत्र, बोटीचे विमा प्रमाणपत्र, संबंधित बोटीसाठी मुंबई पोर्ट ट्रस्टला भरलेले शुल्क आदींची तपासणी केली जाते. प्रत्येक बोटीची महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डातर्फे तपासणी केली जाते व त्यानंतर प्रमाणपत्र जारी केले जाते.
५ जानेवारी रोजी सायंकाळी पार्टी करताना बोटीत पाणी भरू लागल्याने मोठी दुर्घटना होण्याची भीती निर्माण झाली होती. मात्र बोटीवरील प्रवाशांनी आरडाओरडा केल्यावर जवळपास असलेल्या प्रवासी लाँचधारकांनी तिथे जाऊन त्या प्रवाशांना आपल्या लाँचमध्ये घेऊन त्यांचा जीव वाचवला होता.