मुंबईतल्या प्रकल्पांस्थळी निष्काळजीपणा; दुर्घटनांना कारणीभूत कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:06 AM2021-09-19T04:06:05+5:302021-09-19T04:06:05+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात मुंबई महापालिकेसह मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीने पायाभूत सेवा ...

Negligence at projects in Mumbai; Who caused the accidents? | मुंबईतल्या प्रकल्पांस्थळी निष्काळजीपणा; दुर्घटनांना कारणीभूत कोण?

मुंबईतल्या प्रकल्पांस्थळी निष्काळजीपणा; दुर्घटनांना कारणीभूत कोण?

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात मुंबई महापालिकेसह मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीने पायाभूत सेवा सुविधांचे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. अशा प्रकल्पांत कंत्राटदाराने बाळगलेल्या निष्काळजीपणामुळे अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. गेल्या काही वर्षांत अशा घटना सातत्याने घडत आहेत, मेट्रो प्रकल्पांच्या बाबतीत या घटनांना सामोरे जावे लागत आहे. परिणामी अशा घटना घडल्यानंतर अहवाल आणि चौकशीचा ससेमिरा लावण्यापूर्वीच घटना घडू नयेत म्हणून खबरदारी बाळगण्यात यावी, असा सूर लगावला जात आहे.

वॉचडॉग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष गॉडफ्रे पिमेंटा यांनी बीकेसी येथील दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिले आहे. या पत्राद्वारे, मुंबईत सुरु असलेल्या सर्व पायाभूत सेवा सुविधांशी निगडीत प्रकल्पांचे सुरक्षा ऑडिट करणे गरजेचे आहे. कारण गेल्या वर्षात अशा घटनांचे प्रमाण सातत्याने वाढले आहे. शिवाय मुंबईत भुयारी मेट्रो मार्गाचे काम देखील सुरू आहे. येथील भुयारी मेट्रो मार्गाचे काम सुरू असताना लगतच्या इमारतींना हादरे बसत असल्याच्या तक्रारी प्रामुख्याने दाखल होत होत्या. या अनुषंगाने मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून याबाबत खबरदारी घेणे गरजेचे आहे, अशी मागणी करण्यात आली आहे.

मुंबईतल्या पायाभूत सेवा सुविधांशी निगडीत प्रकल्पांचा अभ्यास करणारे अंकुश कुराडे म्हटले की, कोणताही प्रकल्प उभारताना सर्वात पहिल्यांदा कंत्राटदाराने सुरक्षेला प्राधान्य दिले पाहिजे. प्रकल्प सुरू असलेल्या ठिकाणी रस्त्यांवरून जाणारी वाहने, लगतच्या इमारती, रस्त्यावरून जाणारे पादचारी, कामाच्या ठिकाणी काम करणारे कामगार यांच्यासोबत प्रकल्पाची सुरक्षा अत्यंत महत्त्वाची आहे. विशेषत: कंत्राटदाराने सुरक्षा ऑडिटला प्राधान्य दिले पाहिजे; मात्र आपल्याकडे या घटकांना दुय्यम स्थान दिले जाते.

दुर्घटना घडल्यानंतर प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी होते; मात्र तोवर जीवांचे नाहक बळी गेलेले असतात. परिणामी बीकेसी येथील दुर्घटनेतून धडा घेत प्राधिकरणासह पालिकेनेही आपल्या सर्व प्रकल्पांचे सुरक्षा ऑडिट करणे गरजेचे आहे.

कामगारांचीही सुरक्षा महत्त्वाची

इमारतींची सुरक्षा महत्त्वाची आहेच. सोबत रहिवाशांची आणि प्रकल्पामध्ये काम करत असलेल्या कामगारांची सुरक्षादेखील महत्त्वाची आहे. मुंबई महापालिका, एमएमआरडीए आणि कंत्राटदार यांनी कामात निष्काळजीपणा बाळगत कामा नये. परिणामी केवळ पूल असे नाही तर भुयारी मेट्रोच्या कामातदेखील सुरक्षा ऑडिट करणे गरजेचे आहे.

Web Title: Negligence at projects in Mumbai; Who caused the accidents?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.