मुंबई : शस्त्रक्रियेदरम्यान डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे एका मुलीचा मृत्यू झाला. या डॉक्टरांना शिक्षा व्हावी म्हणून दळवी कुटुंबीयांनी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडे (एमएमसी) तक्रार केली आहे. महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे अध्यक्ष डॉ. किशोर टावरी यांच्याकडे त्यांनी पत्र पाठवले आहे.कर्जत येथे राहणाऱ्या नेहा दळवी (१५) हिच्यावर गेल्या तीन महिन्यांपासून हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरू होते. २६ मे रोजी तिच्यावर हिंदुजा रुग्णालयामध्ये पहिली शस्त्रक्रिया पार पडली होती. या शस्त्रक्रियेमध्ये तिच्या मानेजवळ आलेली गाठ काढली होती. यानंतर तिच्या फुप्फुसाजवळ असलेली गाठ काढण्याची शस्त्रक्रिया करायची होती. २४ जून रोजी दुपारी ४ वाजता शस्त्रक्रिया करण्यात येईल, असे डॉक्टरांनी सांगितले. नेहाला ३.३० वाजता आॅपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आले. यानंतर रात्री ९.३० वाजेपर्यंत तिच्यावर शस्त्रक्रिया सुरू होती. यानंतर डॉक्टरांनी येऊन तिची प्रकृती चिंताजनक आहे. यानंतर १० च्या सुमारास डॉक्टर बाहेर आले आणि रक्तदाब कमी झाल्यामुळे मुलीचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती दिल्याचे नेहाचे वडील रवींद्र दळवी यांनी सांगितले़ सायन रुग्णालयात शवविच्छेदन केल्यावर नेहाचा मृत्यू मानेजवळील धमनी कापल्यामुळे झाल्याचे स्पष्ट झाले. डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे मुलीचा मृत्यू झाल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)
नेहाला न्याय मिळवण्यासाठी तक्रार
By admin | Published: July 02, 2014 1:18 AM