Join us

नेहरू सेंटरला छावणी!

By admin | Published: October 13, 2015 3:37 AM

पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री खुर्शिद मेहमूद कसुरी यांच्या पुस्तक प्रकाशनास शिवसेनेने तीव्र विरोध प्रकट केल्याने पोलिसांनी नेहरू सेंटर येथील कार्यक्रम स्थळी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.

मुंबई : पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री खुर्शिद मेहमूद कसुरी यांच्या पुस्तक प्रकाशनास शिवसेनेने तीव्र विरोध प्रकट केल्याने पोलिसांनी नेहरू सेंटर येथील कार्यक्रम स्थळी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे या भागाला छावणीचे स्वरुप आले होते.नेहरू सेंटरच्या दिशेने येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची कसून तपासणी करण्यात येत होती आणि संपूर्ण परिसराची जणू नाकेबंदीच करण्यात आली होती. दोन्ही मार्गांवर बॅरिकेडस् लावण्यात आले होते. मुख्य सभागृहापर्यंत पोहचण्याआधी चार ठिकाणी निमंत्रितांची कसून तपासणी करण्यात येत होती. नेहरू सेंटरमध्ये पार्किंगची पुरेशी सुविधा असतानाही वाहनांना प्रवेश नाकारण्यात आला. मुख्य रस्त्यावरील बॅरिकेटस्जवळच वाहने थांबविली होती. त्यानंतर तीन ठिकाणी प्रत्येक निमंत्रितांची तपासणी करण्यात आली. प्रत्येक टप्यावर आॅब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशनच्या स्वयंसेवकांनाही तैनात करण्यात आले होते. आधी पोलिसांची तपासणी त्यानंतर स्वयंसेवकांनी ओळख पटविल्यावरच पुढे प्रवेश देण्यात येत होता. प्रत्येक टप्प्यावर तपासणीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचे पथक तैनात केले होते.