नेहरू ग्रंथालयाला दुरवस्थेची वाळवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 04:58 AM2019-05-19T04:58:59+5:302019-05-19T04:59:03+5:30
मुंबई विद्यापीठाची जुनी ग्रंथसंपदा धोक्यात
सीमा महांगडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: सर्वाधिक जुनी ग्रंथसंपदा असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलातील जवाहरलाल नेहरू ग्रंथालयाची व येथील पुस्तकांची दुरवस्था झाली आहे.
ही इमारत मोडकळीस आल्याने येथे अभ्यास, पुस्तके घेण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थी, प्राध्यापकांची सुरक्षाच धोक्यात आहे. भाषा विभाग अनेक महिन्यांपासून बंद आहे. विद्यार्थ्यांचे संशोधन करून सादर केलेले अहवाल, ग्रंथसंपदा धूळखात असल्याची माहिती युवासेना सिनेट सदस्य वैभव थोरात यांनी दिली. इमारतीच्या भिंतीचे पापुद्रे गळून पडल्याने अनेक दुर्मीळ पुस्तके खराब झाली आहेत. इमारतीच्या विषयावर सिनेट अधिवेशनात चर्चा होऊनही परिस्थिती जैसे थे आहे, असे थोरात यांनी सांगितले. ग्रंथालयातील ५० वर्षांपेक्षाही अधिक जुनी वर्तमानपत्रे वाईट पद्धतीने ठेवेली आहेत.
‘नवीन इमारतीत स्थलांतरित करावे’
ग्रंथालय नवीन इमारतीमध्ये स्थलांतरित करून विद्यार्थी व पुस्तकांना न्याय देण्याची मागणी सिनेट सदस्य वैभव थोरात यांनी कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांना पत्र लिहून केली आहे.