Join us

चुका नेहरूंच्या, मोदींना दोष कशासाठी? परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, काँग्रेसकडून जनतेची दिशाभूल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2024 5:51 AM

काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे चीनच्या जवानांनी भारतीय जवानांना चोपले असे सांगून आपल्याच जवानांचे खच्चीकरण करीत असल्याची टीका परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी येथे केली.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : चीनने १९५८ आणि १९६२ साली भारताच्या भूभागावर कब्जा केला. त्याआधीही काही भूभाग गिळंकृत केला. मात्र, चीनच्या बाबतीत ज्या चुका देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी केल्या, त्यासाठी काँग्रेस आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जबाबदार धरत आहे. दुसरीकडे काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे चीनच्या जवानांनी भारतीय जवानांना चोपले असे सांगून आपल्याच जवानांचे खच्चीकरण करीत असल्याची टीका परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी येथे केली.

पत्रकार परिषदेत बोलताना जयशंकर म्हणाले, जेव्हा चीनने जमिनीवर अतिक्रमण केले म्हणून केंद्र सरकारकडे बोट दाखवले जाते, तेव्हा हे लक्षात घ्यायला हवे की ही जमीन १९६२ सालीच चीनच्या ताब्यात गेली आहे. मात्र, काँग्रेसकडून जनतेची केवळ दिशाभूल केली जात आहे. २०२० साली गलवान घाटीमध्ये झालेल्या घटनेनंतर चीन आणि भारतातील संबंध ताणले गेले आहेत. तेव्हा ज्यावेळी दोन्हीकडचे सैनिक आपसात भिडले तेव्हा दोन्हीकडचे जवान जखमी झाले. तेव्हापासून नियंत्रण रेषेवर दोन्ही देशांनी आपले जवान तैनात केले आहेत.विरोधकांकडून मोदी हटावचा नारा दिला जात असला तरी मोदींचे हात मजबूत करण्याचा पर्यायच देशासमोर आहे. 

चीनने केलाय केव्हाच कब्जा

अरुणचालमधील ज्या नियंत्रण रेषेवर लोंगजू गाव चीनने उभारल्याचा दावा करण्यात येत आहे, मात्र इथे १९५९ सालीच चीनने कब्जा केला आहे. गुगलवर या गावासंदर्भात नेहरूंनी केलेले भाषणही सापडेल. लडाखमधील पेंगाँग येथे पूल बनवला जात असल्याचे जे बोलले जातेय ती जागा चीनने १९६२ सालीच काबीज केली आहे, असेही जयशंकर म्हणाले.

 

टॅग्स :लोकसभा निवडणूक २०२४एस. जयशंकरमहाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४