सख्खे शेजारी झाले पक्के वैरी!
By admin | Published: February 13, 2017 05:23 AM2017-02-13T05:23:10+5:302017-02-13T05:23:10+5:30
पती-पत्नी, पिता-पुत्र असे एकाच कुटुंबातील उमेदवार एकत्र निवडणुकीच्या रिंगणात असल्याचे आतापर्यंत पाहिले आहे. मात्र प्रभाग क्र. ४१मधील
मुंबई : पती-पत्नी, पिता-पुत्र असे एकाच कुटुंबातील उमेदवार एकत्र निवडणुकीच्या रिंगणात असल्याचे आतापर्यंत पाहिले आहे. मात्र प्रभाग क्र. ४१मधील तीन उमेदवार हे एकाच वसाहतीतील रहिवासी आहेत. यापैकी एक शिवसेनेचे अधिकृत उमेदवार तर अन्य दोन बंडखोर उमेदवार आहेत.
मुंबईतील २२७ प्रभागांमधील लोकप्रतिनिधी निवडण्यासाठी २१ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. आरक्षणामुळे ५० टक्के प्रभाग महिलांसाठी राखीव असल्याने अनेकांनी आपल्या पत्नी, मुलीला निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. काही प्रभागांमध्ये पती-पत्नी शेजारच्याच प्रभागात निवडणूक लढवत आहेत, तर विद्यमान नगरसेवकही आमनेसामने आहेत. परंतु मालाड पूर्व येथील संतोषनगरमध्ये वेगळेच चित्र आहे.
या वसाहतीमधील रहिवासी व शिवसेनेचे माजी नगरसेवक सदाशिव पाटील यांना पक्षाने या वेळेस पुन्हा उमेदवारी दिली आहे. परंतु त्यांच्याविरोधात त्यांचे शेजारी तुळशीराम शिंदे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. शिंदे हे शिवसेनेचे माजी उपशाखाप्रमुख असून, उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी बंडखोरी करीत अर्ज भरला आहे. तर दुसरे उमेदवार राष्ट्रवादीचे माजी सचिव सचिन केळकर यांनी पक्ष सोडून अपक्ष म्हणून अर्ज भरला आहे. (प्रतिनिधी)