मुंबई : वेळेवर उपचार न मिळाल्याने चेंबूर येथील एका वृद्धाला प्राण गमवावे लागले आहेत. चेंबूरच्या सिंधी कॅम्प परिसरात राहणारे समीर नासकर (६१) यांना १० एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास हृदयविकाराचा झटका आला. समीर यांना सायन रुग्णालयात घेऊन जाण्याकरिता त्यांच्या पत्नीने शेजाऱ्यांकडे दार ठोठावत मदत मागितली. मात्र समीर हे कोरोना बाधित असल्याचा संशयावरून शेजाºयांनी मदत नाकारली. यामुळे रुग्णवाहिका येण्यासही उशीर झाला. वेळेत उपचार न मिळाल्याने रविवारी सायन रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. समीर यांचा मृतदेह घरी आणला असता त्यांचा कोरोनाने मृत्यू झाल्याची अफवा परिसरात पसरल्याने कोणीही मदतीला पुढे आले नाही.
लॉकडाऊन असल्याने नातेवाईक देखील अंत्ययात्रेला येऊ शकले नाहीत. यावेळी परिसरातील समाजसेवक रेतीवाला शौकत भाई व राजभाई यांनी मायलेकींना मदत केली. यानंतर पित्याच्या मृतदेहाला आई आणि मुलगी मोनिका नासकर यांनीच खांदा दिला व चरई स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले.