मुंबई: गावी जाताना घरावर लक्ष ठेवा असे शेजाऱ्यांना आपण सांगून जातो. मालाड पश्चिम ला राहणारे माजीद शेख (४३) हे रिक्षा चालक देखील त्यांचे गाव उस्मानाबादला निघाले तेव्हा शेजाऱ्यांना झाडाला पाणी घालायला सांगून गेले. मात्र हे करताना त्यांचे शेजारी घराचा दरवाजा बंद करायला विसरले ज्याचा फायदा घेत चोरांनी जवळपास लाखो रुपयांचा मुद्देमाल शेख यांच्या घरातून पळवून नेला.
शेख यांच्या तक्रारीनुसार ते ११ नोव्हेंबर रोजी कुटुंबासह गावी निघाले. निघताना त्यांनी त्यांचे शेजारी शमीम खान यांना घराची चावी देत घरातल्या झाडांना पाणी द्यायला सांगितले. त्यानंतर १५ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी सात वाजता शेख यांच्या मामांचा मुलगा मोबीन पटेल यांनी तुमच्या घराचा दरवाजा उघडा असून त्याचे सामान अस्ताव्यस्त पडलेले आहे असे शेखना कळवले. ते ऐकल्यावर शेख गावातून १६ नोव्हेंबर रोजी मालाडच्या घरी परतले आणि त्यांनी शमीम यांना याबाबत विचारले. त्यावर झाडाला पाणी दिल्यानंतर घराचा दरवाजा बंद करायला मी विसरलो असे त्यांनी शेखना सांगितले. याप्रकरणी अखेर २३ नोव्हेंबर रोजी मालवणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. चोरट्यांनी जवळपास १ लाख १० हजार ३९० रुपयांचा मुद्देमाल पळवून नेला आहे. त्यानुसार पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.