मुंबई: मुंबईसह देश विदेशातील नागरिकांना गंडा घालणाऱ्या नायजेरियन टोळीतील चार जणांना कुलाबा पोलिसांनी अटक केली. त्या पाठोपाठ त्यांना मदत करणाऱ्या भारतीय तरुणांनाही अटक करण्यात आली आहे. किशन शंकर मकवाना (४५), नरेंद्र बनसोडे (४८), राजेश वसईकर (४५) आणि दीपक वाईकर (४३) अशी अटक केलेल्या भारतीयांची नावे आहेत. लॉटरी, लकी ड्रॉ, नोकरीचे आमिष, बनावट वेबसाइटसह वेश्या व्यवसायासाठी मुली पुरविण्याच्या नावाखाली अटकेत असलेले मायकेल कलू इबे (३८), उगवू उचेना (३९), ओकाफॉर एमॅन्युअल ओएंका (२४), अॅन्थोनी विसडॉप (३६) हे नागरिकांना गंडा घालत होते. खारघर येथून या चौघांना अटक करण्यात आली होती. स्वत:च्या खाते उघडून पैसे जमा करणे शक्य नसल्याने, ते मुंबईतील गरजू तरुणांंना या कामासाठी गाठत होते. त्यांना कमिशन मिळवून देण्याच्या नावाखाली फसवणुकीतून आलेली रक्कम, त्यांच्या खात्यात जमा केली जायची. दिवसाला दोन ते तीन लाखांचा व्यवहार विविध बँक खात्यातून होत असे. एकत्रित जमा जमा झालेली ही सर्व रक्कम नेट बॅकिंगद्वारे नायजेरियातील बँकेत ट्रान्सफर केली जात असल्याचे तपासात समोर आले. आत्तापर्यंत २० पेक्षा जास्त बँक खात्यातील रक्कम नायजेरियन बँकेत ट्रान्सफर झालेली दिसून आली आहे. यामध्ये दलालाचे काम करत असलेल्या मकवानाच्या मदतीने, मुंबईतील काही तरुण या रॅकेटसाठी काम करत होते. व्हॉट्सअॅपवरून सुरू असलेल्या या टोळीच्या कारभाराचा डेटा पोलिसांच्या हाती लागला आहे. अटक आरोपींकडून आत्तापर्यंत तब्बल १८ मोबाइल्ससह ७ विविध बँकांची कार्डस् हस्तगत करण्यात आली. त्यानुसार अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त रवींद्र शिसवे यांनी दिली. (प्रतिनिधी)
नायजेरियन टोळीशी जवळीक आली अंगलट
By admin | Published: December 16, 2015 2:18 AM