ना CM फडणवीस, ना नेते; 'कोस्टल रोड' भूमिपूजनावेळी भाजपाचं कुणीच का नव्हतं? युतीत उडाला होता खटका!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2024 01:32 PM2024-03-11T13:32:20+5:302024-03-11T13:33:01+5:30

भाजपा-सेना युतीत २०१८ सालीच खटका उडाला होता. कोस्टल रोडच्या भूमिपूजनासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण दिलं गेलं नव्हतं.

Neither devendra fadnavis nor leaders Why was there no one from BJP during coastal road Bhumi Poojan There was a crisis in shivsena bjp alliance | ना CM फडणवीस, ना नेते; 'कोस्टल रोड' भूमिपूजनावेळी भाजपाचं कुणीच का नव्हतं? युतीत उडाला होता खटका!

ना CM फडणवीस, ना नेते; 'कोस्टल रोड' भूमिपूजनावेळी भाजपाचं कुणीच का नव्हतं? युतीत उडाला होता खटका!

मुंबई-

मुंबईतील महत्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेल्या किनारी रस्ता प्रकल्पातील (कोस्टल रोड) वरळी ते मरीन ड्राइव्ह या एका मार्गिकेचं उदघाटन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आलं. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाच्या भूमिपूजनावेळी राज्याचा मुख्यमंत्री असूनही बोलवण्यात आलं नव्हतं, उद्धव ठाकरेंनी रातोरात भूमिपूजन करुन टाकलं अशी खंत बोलून दाखवली. 

भाजपा-सेना युतीत २०१८ सालीच खटका उडाला होता. कोस्टल रोडच्या भूमिपूजनासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण दिलं गेलं नव्हतं. त्यामुळे भाजपामध्ये नाराजी निर्माण झाली होती. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या आदेशामुळे भाजपच्या इतर नेत्यांनीदेखील या कार्यक्रमावर बहिष्कार घातला होता. भूमिपूजनाच्या कार्यक्रमाचे भाजप आमदार मंगलप्रभात लोढा यांना निमंत्रण देण्यात आले होते. परंतु पक्षातील वरिष्ठांनी या कार्यक्रमाला कोणीही न जाण्याचे आदेश दिल्याने ते या कार्यक्रमासाठी उपस्थित नव्हते.

फडणवीसांना निमंत्रण का नव्हतं?
कोस्टल रोडच्या भूमिपूजनाआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुंबई दौरा झाला होता. युती असूनही या दौऱ्यावेळी भाजपाकडून उद्धव ठाकरे यांना निमंत्रण देण्यात आलं नव्हतं. यामुळेच शिवसेनेनं कोस्टल रोडच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमामधून भाजपला डावलून त्याची परतफेड केल्याचं बोललं गेलं होतं.

मविआ सरकारवर केले आरोप
वरळी ते मरीन ड्राइव्ह या एका मार्गिकेच्या आजच्या उदघाटन सोहळ्यात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्कालीन ठाकरे सरकारवर गंभीर आरोप केले. "मविआ सरकारच्या काळात कोस्टल रोडच्या कामासाठी प्रचंड वसुली सुरू होती. कंत्राटदार माझ्याकडे तक्रारी घेऊन यायचे. शिंदे मुख्यमंत्री झाले आणि भ्रष्टाचार बंद झाला. नाहीतर अजून दोन-चार वर्ष हा रस्ता पूर्ण झाला नसता", असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

Web Title: Neither devendra fadnavis nor leaders Why was there no one from BJP during coastal road Bhumi Poojan There was a crisis in shivsena bjp alliance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.