Join us

ना अपघाताची भीती ना दंडाची; दुचाकी चालविताना मोबाइलवर बोलणारे वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2021 4:08 AM

लोकमत न्युज नेटवर्कमुंबई : दुचाकी, चारचाकी वाहन चालवताना मोबाइलवर बोलल्यामुळे अपघात होऊन अनेकांचा बळी जातो, मात्र तरीही वाहन ...

लोकमत न्युज नेटवर्क

मुंबई : दुचाकी, चारचाकी वाहन चालवताना मोबाइलवर बोलल्यामुळे अपघात होऊन अनेकांचा बळी जातो, मात्र तरीही वाहन चालवताना मोबाइल बोलण्याचे प्रमाण वाढत आहे. परिणामी अपघातांचे प्रमाण वाढले आहे.

मुंबईत २०१९ मध्ये १८६८० जणांवर कारवाई करण्यात आली होती. २०२० मध्ये १८५५ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीवर निर्बंध होते. २०२० मध्ये आकडा कमी झाला आहे, असे वाहतूक विभागाच्या काही अधिकाऱ्यांनी सांगितले.

आपल्या जीवापेक्षा काहीही महत्त्वाचे नाही. त्यामुळे वाहन चालविताना मोबाइलवर बोलू नये आणि जर अतिआवश्यक फोन असेल तर वाहन थांबवून बोलावे. पण तरीही मोबाइलवर बोलणाऱ्यांचे प्रमाण कमी होताना दिसून येत नाही. विशेष म्हणजे शासकीय बस, शासकीय वाहने यांच्यावरील चालकही गाडी चालविताना मोबाइलवर बोलत असताना दिसतात. वाहन चालविताना मोबाइलवर बोलणाऱ्या चालकांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. उजव्या हातात गाडीचे हॅण्डल आणि डाव्या हातात मोबाइल पकडून गाडी चालवत बोलणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस प्रचंड वाढत आहे.

मोबाइलवर बोलणे आणि वाहन चालविणे या दोन्ही क्रिया सोबत असतील तर चालकाचे लक्ष विचलित होते. त्यामुळे वाहनावरील नियंत्रण सुटून अपघात होऊ शकतो. दुचाकी चालविताना मान वाकडी करून खांदा आणि मानेमध्ये मोबाइल पकडून बिनधास्तपणे मोबाइलवर बोलत असतात. त्यामुळे अशांना पकडण्याची विशेष मोहीम राबवून मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्याची गरज आहे.

२०० रुपये दंड

वाहन चालवताना मोबाइलवर बोलताना पोलिसांनी पकडल्यास २०० रुपये दंड आकारला जातो. ही दंडाची रक्कम कमी असल्याने अनेकदा वाहनचालक मोबाइलवर बोलताना आढळून येतात. मात्र वाहन वळविताना किंवा सिग्नल जवळ असेल तर यासोबत धोकादायक वाहन चालविण्याचीदेखील कारवाई करण्यात येते. हे मोबाइलचे २०० आणि धोकादायक वाहन चालविण्याचे १००० असा एकूण १२०० रुपयांचा दंड आकारण्यात येतो.

मुंबईत दुचाकी चालविताना मोबाइल बोलणाऱ्यांवर झालेली कारवाई

२०१९ची कारवाई- १८६८०

२०२०ची कारवाई १८५५

वाहन चालविताना कोणीही मोबाइलवर बोलू नये. त्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होतात. वाहनचालकांनी स्वतःच काळजी घ्यावी. मुंबईत वाहन चालविताना मोबाइलवर बोलणाऱ्यांवर कारवाई सुरूच आहे. येत्या काही दिवसात हा या बेशिस्त वाहनचालकांचा परवाना रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल.

- प्रवीण पडवळ, अतिरिक्त पोलीस आयुक्त, वाहतूक विभाग