Join us

ना जम्मू ना काश्मीर, हा तर 'गारपीटग्रस्त' महाराष्ट्र; अवकाळीने मोठं नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2023 9:46 AM

मुंबई - सोमवारी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा, मका पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अचाकन वातावरणात ...

मुंबई - सोमवारी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा, मका पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अचाकन वातावरणात झालेल्या बदलाने गावोगोवी एकीकडे होळी पेटली असतानाच काही ठिकाणी वीजांच्या कडकडाटासह पाऊसही पडला. अनेक ठिकाणी गारांनीही परिसराला झोडपल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे, काही भागांत काश्मीरसदृश्य दृश्य दिसत होते. काळ्या मातीवर बर्फाने चादर ओढली की काय असेच दृश्य होते. मात्र, या गारपीटीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून रब्बीची पीके खराब झाली आहेत.  

राज्यातील विदर्भ, मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्रातील काही ठिकाणी गारपीट झाली. बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील बंगाली-पिंपळा, कवडगांव, सुशी, वडगाव, चिखली, कोळगाव, पाडळसिंगी, मादळमोही, धोंडराई, उमापूर, कुंभेजळगाव, तलवाडा सह तालुक्यातील अनेक गावातील परिसरात सोमवारी सायंकाळी जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस होवून काही ठिकाणी गारपीट झाली. तर, उत्तर महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यातही गारपीट झाली. याचा एक व्हिडीओ समोर आला असून काश्मीरसृश्य दृश्य दिसून येते. धुळे जिल्ह्यातील खोरी टिटाने परिसरामध्ये प्रचंड गारपीट झाली. गारपिटीनंतर काश्मीरसारखी सर्वत्र बर्फाची चादर पसरलेली पाहायला मिळाली. एक तास चाललेल्या गारपीटीने परिसरात शेतमालाचे मोठं नुकसान केलं आहे. धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील काही भागात प्रचंड गारपीट झाली आहे. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सुरू झालेल्या या गारपिटीने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. 

दरम्यान, हवामान विभागाने अवकाळी पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यानुसार, मुंबईतीलही काही भागांत अचाकन वीजांच्या कडकडाटासह पाऊस पडला. कल्याण डोंबिवलीत मध्यरात्री विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस कोसळला. अचानक झालेल्या पावसामुळे स्टेशन परिसरातील प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली असून या पावसामुळे अनेक भागांत बत्ती गुल झाल्यानं नागरिकांना काही वेळ अंधारातच राहावे लागले.

टॅग्स :पाऊसजम्मू-काश्मीरधुळेनंदुरबार