मुंबई : एकीकडे राज्यात तब्बल पाच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (टीएआयटी) परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र दोन आठवडे उलटले तरी परीक्षेचा निकाल अजूनही घोषित करण्यात आलेला नाही. दुसरीकडे सरकारी कार्यालयांमधील विविध पदांची भरती करण्यासाठी नऊ एजन्सी नेमल्याचे जाहीर करण्यात आले. संबंधित भरतीही कंत्राटी तत्त्वावर राहणार आहे. कंत्राटीकरणाचा घाट कशासाठी, असा सवाल बेरोजगारांनी केला आहे.कंत्राटीकरणाविरोधात तब्बल ४० हजारांपेक्षा अधिक बेरोजगार युवकांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना संदेश पाठविला. त्यासाठी डीटीएड, बीएड स्टुडंट असोसिएशनने सोशल मीडियावर बेरोजगारी हा हॅशटॅग वापरून अनोखे आंदोलन केले आहे.
शिक्षक भरतीत पुन्हा घोटाळ्याची भीती? टेट परीक्षेतील प्रश्नांच्या पद्धतीवरच काही उमेदवारांनी आक्षेप घेतला होता, तर दुसरीकडे ५ मार्चपूर्वी परीक्षेचा निकाल घोषित करण्याच्या न्यायालयीन आदेशाकडे परीक्षा परिषदेने दुर्लक्ष केल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. तीन लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. पवित्र पोर्टलच्या माध्यमातून रिक्त पदे भरण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे. त्यानुसार २०१७ नंतर अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी घेण्याचा मुहूर्त सरकारला मिळाला होता. ५ मार्चला निकाल जाहीर होणे अपेक्षित होते.
कंत्राटीकरणास विरोधसरकारी नोकऱ्यांचे कंत्राटीकरण थांबवावे, उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने नऊ एजन्सींना कंत्राट देण्यासंदर्भात काढलेला जीआर ताबडतोब रद्द करावा, अशी मागणी संबंधित आंदोलनाद्वारे करण्यात आली.