दसरा मेळावा! ना ठाकरेंना, ना शिंदेंना; शिवाजी पार्क सील होणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2022 01:27 PM2022-09-21T13:27:19+5:302022-09-21T13:28:42+5:30

ठाकरे गट मुंबई महापालिकेवर धडकला

Neither to Thackeray, nor to Shinde; Shivaji Park will be sealed? | दसरा मेळावा! ना ठाकरेंना, ना शिंदेंना; शिवाजी पार्क सील होणार?

दसरा मेळावा! ना ठाकरेंना, ना शिंदेंना; शिवाजी पार्क सील होणार?

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क 
मुंबई : दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क शिवसेनेचा उद्धव ठाकरे गट किंवा एकनाथ शिंदे गट यांच्या गटाला न देता सील करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. त्यातच विधी व न्याय विभागाने शिवसेनेबाबतचा वाद सध्या सर्वोच्च न्यायालयात असल्याने शिवाजी पार्क दोघांपैकी कोणालाही देऊ नये, असे मत दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र, विभागाकडून या वृत्तास दुजोरा देण्यात आला नाही.

शिंदे गटाला बीकेसी मैदानावर दसरा मेळावा घेण्यास आधीच महापालिकेने परवानगी दिली आहे. त्यामुळे शिंदे गटाचा मेळावा त्या ठिकाणी होईल. मात्र, त्याचवेळी ठाकरे गटाला शिवाजी पार्क देऊ नये, कारण शिवसेना कोणाची हा वाद न्यायालयात आहे, अशी भूमिका घेत शिंदे गटाकडून महापालिकेला पत्र दिले जाण्याची शक्यता आहे. शिवाजी पार्क दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेला देण्यासंदर्भात लवकरात लवकर निर्णय घ्यावा, यासाठी मंगळवारी शिवसेना उपनेते मिलिंद वैद्य यांचे शिष्टमंडळ पालिकेच्या दादर जी-उत्तर विभागात सहायक आयुक्त प्रशांत सपकाळे यांना भेटले. त्यांनी शिवसेनेच्या अर्जाचा विचार करून दसरा मेळाव्यासाठी मैदान उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी केली. आपले अर्ज विधी खात्याच्या अभिप्रायासाठी पाठवण्यात आले आहेत. त्यांच्या अभिप्रायानंतरच आपल्या अर्जाचा विचार करण्यात येईल, असे सपकाळे यांनी शिष्टमंडळाला सांगितले. 

शिवाजी पार्कसाठी ठाकरे गट ठामच        
कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण व्हायचा नसेल तर शिवाजी पार्क आम्हालाच द्यावा लागेल, असा इशारा ठाकरे गटाच्या प्रवक्त्या किशोरी पेडणेकर यांनी दिला आहे. सहायक आयुक्तांनी विधी खात्याकडे अर्ज पाठवून देखील ५ ते ६ दिवस उलटून गेले आहेत. परंतु विधी खात्याला सोमवारपर्यंत अर्ज मिळालाच नसल्याचे आम्हाला समजले आहे. त्यामुळे नेमके काय गौडबंगाल आहे, हे पाहावे लागेल. विधी खात्याचा अहवाल शिवसेनेच्या बाजूने येणार असल्यामुळे मैदानाची परवानगी मिळेल, असा विश्वास शिवसेनेच्या पालिकेतील माजी सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी व्यक्त केला.

Web Title: Neither to Thackeray, nor to Shinde; Shivaji Park will be sealed?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.