मुंबई-
मुंबईतील सहा मतदार संघांपैकी दक्षिण मुंबई मतदार संघाची सर्वाधिक चर्चा निवडणूक काळात झाली होती. ठाकरे गटाच्या अरविंद सावंत यांनी विजयाची हॅट्ट्रीक करत शिंदे गटाच्या यामिनी जाधव यांचा ५२ हजार मतांनी पराभव केला. सावंत यांना मिळालेल्या मतांची विधानसभा मतदारसंघ निहाय आकडेवारीतून एक धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. यामिनी जाधव ज्या भायखळा विधानसभा मतदार संघाचं प्रतिनिधीत्व करतात त्याच मतदार संघातून अरविंद सावंत यांना सर्वाधिक मतं मिळाली आहेत.
दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघात वरळी, शिवडी, भायखळा, मुंबादेवी, मलबार हिल आणि कुलाबा हे सहा विधानसभा मतदार संघ येतात. यातील वरळी आणि शिवडी मतदार संघात ठाकरे गटाचे आमदार आहेत. यात वरळीतून स्वत: आदित्य ठाकरे आमदार आहेत. पण वरळी आणि शिवडीपेक्षाही अधिक मतं अरविंद सावंत यांना भायखळा मतदार संघात मिळाली आहेत.
भायखळा विधानसभा मतदार संघात यामिनी जाधव यांना ४० हजार ८१७ मतं मिळाली आहेत. तर अरविंद सावंत यांना दुप्पट म्हणजे तब्बल ८६ हजार ८८३ मतं मिळाली आहेत. यामिनी जाधव यांच्यापेक्षा सावंत यांना या एकट्या मतदार संघात ४६ हजार ६६ मतांची आघाडी मिळाली. म्हणजे भायखळा मतदार संघाचाच अरविंद सावंत यांच्या विजयात मोठा वाटा आहे.
वरळी विधानसभेत अरविंद सावंत यांना यामिनी जाधव यांच्यापेक्षा फक्त ६ हजार ७१५ अधिक मतं मिळाली आहेत. तर शिवडी विधानसभेत जिथं ठाकरे गटाचे अजय चौधरी आमदार आहेत. तिथं अरविंद सावंत यांना यामिनी जाधव यांच्यापेक्षा फक्त १६ हजार ९०३ अधिक मतं मिळाली आहेत.
भाजपा आमदारांनी यामिनी जाधवांना तारलंयामिनी जाधव यांना त्यांच्या स्वत:च्या भायखळा मतदार संघातील मतदारांनी नाकारलं. तर कुलाबा आणि मलबार हिल मतदार संघांनी यामिनी जाधव यांना चांगली मतं दिल्याचं आकडेवारीवरुन स्पष्ट झालं आहे. मलबार हिलमध्ये भाजपाचे मंगलप्रभात लोढा आमदार आहेत. तर कुलाब्यामध्ये राहुल नार्वेकर आमदार आहेत. मलबार हिल मतदार संघात यामिनी जाधव यांना तब्बल ८६ हजार ८६० मतं मिळाली. याठिकाणी सावंतांना ३९ हजार ५७३ मतं आहेत. यामिनी जाधव यांना या मतदार संघातून ४८ हजार २८७ मतं जास्त मिळाली आहेत. दुसरीकडे कुलाबा मतदार संघात यामिनी जाधव यांना ५६ हजार ७७८ आणि अरविंद सावंत यांना ४७ हजार ६८४ मतं मिळाली आहेत. इथं यामिनी जाधव यांना ९ हजार ९४ मतं अधिक मिळाली आहेत.
कोणत्या विधानसभेत किती मतदान?मलबार हिल-अरविंद सावंत- ३९,५७३यामिनी जाधव- ८७,८६०
कुलाबा-अरविंद सावंत- ४७,६८४यामिनी जाधव- ५६,७७८
शिवडी-अरविंद सावंत- ७६,०५३यामिनी जाधव- ५९,१५०
भायखळाअरविंद सावंत- ८६,८८३यामिनी जाधव- ४०,८१७
वरळीअरविंद सावंत- ६४,८४४यामिनी जाधव- ५८,१२९
मुंबादेवीअरविंद सावंत- ७७,४६९यामिनी जाधव- ३६,६९०
एकूणअरविंद सावंत- ३,९२,५०६यामिनी जाधव- ३,३९,४२४
अरविंद सावंत यांचा ५३,०८२ मतांनी विजय