मुंबई/माथेरान : दीड वर्षापासून बंद असलेल्या नेरळ-माथेरान मार्गावर गुरुवारी टॉयट्रेनची चाचणी पूर्ण झाली. डिझेल इंजीनसह आठ बोगी असलेली टॉयट्रेन या मार्गाहून धावली. चाचणी यशस्वी झाली असली तरी मध्य रेल्वेने अद्याप नेरळ-माथेरान टॉयट्रेन सेवेची तारीख घोषित केलेली नाही. मात्र रेल्वेच्या वरिष्ठ अधिका-यांच्या मते २६ जानेवारी रोजी नेरळ-माथेरान टॉयट्रेन सुरू होण्याची शक्यता आहे. सद्य:स्थितीत अमनलॉज-माथेरान या मार्गावर टॉयट्रेन सुरू आहे.गुरुवारी सकाळी नेरळहून माथेरानकरिता रेल्वेच्या तंत्रज्ञांसह गाडी रवाना करण्यात आली. गुरुवारी दिवसभर या मार्गावर विविध स्वरूपात ही गाडी चालवून सुरक्षेची चाचणी घेण्यात आली. चाचणीदरम्यान अमनलॉज-माथेरान ही सेवा बंद करण्यात आली होती. त्याचबरोबर शुक्रवारी सकाळी ८.५० वाजताची माथेरानहून अमनलॉजकडे जाणारी पहिली टॉयट्रेन फेरी रद्द करण्यात आली आहे. चाचणीचा अहवाल रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडे पाठवण्यात येणार आहे. त्यानंतरच नेरळ-माथेरान मार्गावर ही सेवा सुरू करण्यात येईल. ही सेवा सुरू झाल्यास माथेरानचे प्रवेशद्वार दस्तुरीनाका येथील वाहतूककोंडीतून पर्यटकांची सुटका होणार असल्याने येथील स्थानिकांनीही या चाचणीचे स्वागत केले.
नेरळ-माथेरान टॉयट्रेन चाचणी अखेर पूर्ण , २६ जानेवारीपासून धावणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2018 5:35 AM