Join us

नेरळ-माथेरानच्या मार्गाची होणार डागडुजी

By admin | Published: February 06, 2017 3:02 AM

माथेरानची मिनी ट्रेन दोन वेळा रुळावरून घसरण्याच्या घटनेनंतर ही ट्रेन सुरक्षेच्या कारणास्तव बंद ठेवण्यात आली. साधारण आठ महिने उलटल्यानंतरही ही ट्रेन सुरू होण्याबाबत अनिश्चितता आहे

मुंबई : माथेरानची मिनी ट्रेन दोन वेळा रुळावरून घसरण्याच्या घटनेनंतर ही ट्रेन सुरक्षेच्या कारणास्तव बंद ठेवण्यात आली. साधारण आठ महिने उलटल्यानंतरही ही ट्रेन सुरू होण्याबाबत अनिश्चितता आहे. मात्र मिनी ट्रेन सुरू करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. नेरळ ते माथेरान मार्गाची डागडुजी करण्यासाठी ३ कोटी रुपये अर्थसंकल्पात मंजूर करण्यात आले असून, सुरक्षा उपाययोजनांसाठीही दीड कोटी रुपये मिळाले आहेत. मध्य रेल्वेने प्रवासी सुरक्षेच्या कारणास्तव ट्रेन बंद करण्याचा निर्णय घेतला आणि मे २0१६पासून सेवा बंद ठेवण्यात आली. ही ट्रेन सुरू करण्याची मागणी स्थानिकांबरोबरच पर्यटकांकडूनही करण्यात आली. यानंतर रेल्वे बोर्डाच्या आदेशानुसार सुरक्षा उपाय योजण्यासाठी चार सदस्यांच्या एका स्वतंत्र समितीचीही स्थापना करण्यात आली. या समितीकडून अहवाल सादर करण्यात आला. अहवालातून मिनी ट्रेनमध्ये सुधारणा करण्याबरोबरच प्रवाशांसाठी सुरक्षेच्या उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या. समितीने सादर केलेल्या अहवालात एअर ब्रेक बसवितानाच घाट सेक्शनमध्ये ६५0 मीटरची भिंतही बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. तर रुळांची स्थितीही खराब झाल्याने त्यात बदल करण्याचा विचार सुरू केला. तसा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला. तर मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांनी नुकतीच नेरळ-माथेरान मार्गाची पाहणी करीत रुळांची स्थिती व प्रवासी सुरक्षेच्या बाबींची पूर्तता केल्याशिवाय मिनी ट्रेन सेवा सुरू करणे अशक्य असल्याचे सांगितले होते.