नेरूळ तलाव बनला मद्यपींचा अड्डा
By admin | Published: November 5, 2014 04:06 AM2014-11-05T04:06:29+5:302014-11-05T04:06:29+5:30
तलाव व्हिजनच्या माध्यमातून महापालिकेने नेरूळ तलावाचेही सुशोभीकरण केले. परंतु देखभाली अभावी या ठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे.
नवी मुंबई : तलाव व्हिजनच्या माध्यमातून महापालिकेने नेरूळ तलावाचेही सुशोभीकरण केले. परंतु देखभाली अभावी या ठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. नागरिकांच्या सोयीसाठीचा हा तलाव सध्या मद्यपींचा अड्डा बनला असून त्याकडे पालिका व पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
ठाणे शहराप्रमाणे नवी मुंबईलाही तलावांची देणगी लाभली आहे. शहरात २४ तलाव असून महापालिकेने एकत्रित तलाव व्हिजन राबविले आणि तलाव व परिसराचे सुशोभीकरण केले. यामध्ये नेरूळ ४ हजार चौरस मिटरचा तलाव सुशोभीत करण्यात आला. गॅबीयन वॉल टाकून त्याचे दोन भाग करण्यात आले. तलावाच्या बाजूने राजस्थानी दगडाचे खांबांवर पथदिव्यांची सोय करण्यात आली. तसेच नागरिकांना बसण्यासाठी चारही बाजूला कौलारु शेड , दोन्ही बाजूला निर्माल्य कलश तसेच उद्यान विकसीत करून तेथे मुलांना खेळण्यासाठी घसरगुंडी व झोपाळे बसविले आहेत. मात्र दुर्देवाने देखभालीसाठी येथे स्वतंत्र यंत्रणाच नाही. परिणामी तलावाची पूर्णपणे दूरवस्था झाली आहे.
तलावामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा साठला आहे. निर्माल्य कलश खराब झाले असून त्याला कचरा कुंडीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. तलावाच्या बाहेरील बाजूला कचरा टाकला जात असल्याने येथे प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. पथदिव्यांचे खांब पडले असून कुंपण तुटले आहे. उद्यान हा मद्यपींचा अड्डा बनला आहे. सायंकाळी ७ पासून रात्री उशीरापर्यंत येथे मोठ्या प्रमाणात मद्यपान सुरू असते. रोज मद्याच्या २० ते २५ बाटल्या येथे आढळून येतात. काही बाटल्या उद्यानामध्ये फोडल्या जातात तर काही तलावामध्ये टाकल्या जातात. याकडे पोलिस प्रशासन दुर्लक्ष करत असून मद्यपींवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी रहिवाशांकडून केली जात आहे. (प्रतिनिधी)