नेरूळमध्ये नऊ दुकाने फोडली
By admin | Published: January 13, 2015 12:56 AM2015-01-13T00:56:22+5:302015-01-13T00:56:22+5:30
नेरूळ परिसरात एकाच रात्री नऊ ठिकाणी घरफोड्या झाल्या आहेत. बंद दुकानांचे टाळे तोडून घरफोडीच्या या सर्व घटना घडल्या आहेत
नवी मुंबई : नेरूळ परिसरात एकाच रात्री नऊ ठिकाणी घरफोड्या झाल्या आहेत. बंद दुकानांचे टाळे तोडून घरफोडीच्या या सर्व घटना घडल्या आहेत. त्यामध्ये एकूण ४५ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला असून नेरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरात पुन्हा गुन्हेगार डोके वर काढू पाहत असल्याचे दिसू लागले आहे. गेल्या काही दिवसांत घरफोडीच्या घटनांनी जोर धरला आहे. घरफोडीच्या उद्देशाने चार दिवसांपूर्वीच सारसोळे येथे महिला पोलिसावर हल्ला झाला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी वाशी येथे वृध्द दाम्पत्यावर दरोडेखोरांनी हल्ला केला. त्यामध्ये एकाचा प्राण देखील गेला. अशातच नेरूळमध्ये एकाच रात्री नऊ ठिकाणी घरफोडीच्या घटना घडल्या आहेत. सेक्टर २१ व २५ मधील स्टेशनरी, चष्मा, कपडे, प्लायवूड तसेच ट्रॅव्हल्स आदी दुकानांचा त्यात समावेश आहे. ही दुकाने बंद असताना शटरचे कुलूप तोडून तेथे घरफोड्या झाल्या. त्यामध्ये रोख रक्कम व साहित्य असा सुमारे ४५ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. याप्रकरणी नेरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनेक दुकानांच्या शटरला बसवलेले मोठमोठे टाळे देखील या चोरट्यांनी सहज तोडलेले आहेत. त्यामुळे घरफोडी करणारी सराईत टोळी शहरात सक्रिय झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे. गेल्या काही महिन्यात गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून पोलिसांनी शहरातील गुन्हेगारीच्या घटना नियंत्रित आणल्या होत्या. मात्र गेल्या काही दिवसांपासून सलग घडणाऱ्या घरफोडीच्या घटनांवरून गुन्हेगार पुन्हा डोके वर काढू लागल्याचे दिसत आहे. वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्याचे आव्हान पोलीसांसमोर आहे. (प्रतिनिधी)