विज्ञानाच्या नभातील सप्तर्षींना आणले सर्वसामान्यांसमोर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 05:18 AM2020-02-28T05:18:48+5:302020-02-28T05:18:52+5:30
संजय केतकर यांचे योगदान; भारतीय शास्त्रज्ञांवरील डॉक्युमेंटरीचे रचनाकार
- स्नेहा पावसकर
ठाणे : विज्ञानाच्या आधारावरच हे जग चालले आहे. भारताचा विज्ञान क्षेत्रातील इतिहास पाहता अनेक थोर आणि नामवंत शास्त्रज्ञांचे योगदान पाहायला मिळते. पण, सामान्यांपासून ते शासनापर्यंत सर्वांच्याच नजरेत ती मंडळी तुलनेने दुर्लक्षित राहिली. अशाच दुर्लक्षित प्रज्ञावंतांना शोधून त्यांची, त्यांच्या महान कार्याची ओळख भारतीयांनाच नाही, तर जगाला करून देण्याचे शिवधनुष्य पेलले ज्येष्ठ पत्रकार, अभ्यासक संजय केतकर यांनी.
केतकर यांनी भारतातील सात प्रसिद्ध शास्त्रज्ञांवर आधारित बायोग्राफिकल डॉक्युमेंटरी तयार केल्या. त्या जगभरात पाहिल्या गेल्या, मात्र भारतातील प्रसारमाध्यमांनी त्यांची ही कल्पना पुढे नेली नाही, याची त्यांना खंत आहे.
दैनंदिन वापरातील प्रत्येक वस्तू ही विज्ञान-तंत्रज्ञानाचा आविष्कार आहे. भारतीय शास्त्रज्ञांचे त्यात मोठे योगदान आहे. आजही भारतातील विविध संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात संशोधन सुरू आहे. मात्र, त्याची माहिती सर्वसामान्यांना नसते. भारतात विज्ञान क्षेत्रात काय काम चालते किंवा कोणकोणते कार्य झाले आहे, याचा शोध घेण्याच्या उद्देशाने ठाणेकर संजय केतकर यांनी २००५ साली भारतातील थोर शास्त्रज्ञांवर डॉक्युमेंटरी करण्याचे ठरवले. त्यासाठी भारतीय विज्ञान क्षेत्रातील डॉ.रघुनाथ माशेलकर, डॉ.एम.एम. शर्मा, प्रो.सी.एन. आरराव, ए.व्ही. रामाराव, डॉ. केकीघरडा, डॉ.जे.बी. जोशी, डॉ.जी.डी. यादव अशा सात शास्त्रज्ञांची निवड केली. या प्रत्येकावर साधारण २५ मिनिटांची डॉक्युमेंटरी तयार केली. त्यासाठी संजय यांनी सातही जणांबरोबर मोठा काळ व्यतीत केला. त्यांची दिनचर्या, काम, त्यांचा अभ्यास, आवडनिवड, त्यांची वैशिष्ट्ये आदींचे निरीक्षण केले. या सातही जणांवर डॉक्युमेंटरी बनवण्यासाठी त्यांना सुमारे १२ वर्षांचा कालावधी लागला. या सर्व डॉक्युमेंटरी इंग्रजी भाषेत असून केवळ डॉ. माशेलकर यांच्यावरील डॉक्युमेंटरी मराठी भाषेतही आहे.
या सर्व तज्ज्ञांच्या भेटीतून मला नवीन काही शिकायला मिळाले. ही सगळी मंडळी वेळेचं पालन करणारी आहेत. विज्ञानाबरोबर त्यांना अन्य क्षेत्रातही रुची आहे. आज सीएसआयआरप्रमाणेच भारतात मोठ्या प्रमाणात संशोधन चालतं. मात्र, विज्ञान-तंत्रज्ञानातील इतर संस्थांना शासनाकडून अपेक्षित अनुदान मिळत नाही, ही खंत आहे. आज प्रत्येकाच्या हातात मोबाइल आहे. त्यामुळे आपल्या ओळखीतील एखादा पदवीधारक किंवा विद्यार्थी विज्ञान क्षेत्रात काही आगळंवेगळं संशोधन करत असेल, तर मुलांनी हातातील कॅमेऱ्यातून त्याची छोटी बायोग्राफी करून ती यू-ट्युबवर अपलोड केली पाहिजे.
- संजय केतकर