Join us

परिचारिकांनी रुग्णांची केलेली सेवा हे सेवाव्रत- हेमांगी वरळीकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2018 12:54 AM

परिचारिका महापौर व पालिका आयुक्त गौरव पुरस्कार सोहळा

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेतील रुग्णालयांमध्ये येणाऱ्या रुग्णांची परिचारिका करीत असलेली शुश्रूषा ही एक सेवा नसून ते एक सेवाव्रत असल्याचे प्रतिपादन उपमहापौर हेमांगी वरळीकर यांनी केले. २०१५ व २०१६ करिता देण्यात येणारा परिचारिका महापौर व महापालिका आयुक्त गौरव पुरस्कार मुंबईच्या उपमहापौर हेमांगी वरळीकर यांच्या हस्ते गुरुवारी सकाळी टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय सभागृह, बाई य. ल. नायर रुग्णालय, मुंबई सेंट्रल येथे आयोजित कार्यक्रमात प्रदान करण्यात आले. त्या वेळी त्या बोलत होत्या. २०१५ या वर्षाकरिता एकूण ३२ महापौर पुरस्कार व एकूण ३५ महानगरपालिका आयुक्त पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते परिचारिकांना प्रदान करण्यात आले. २०१६ या वर्षांकरिता एकूण ३३ महापौर पुरस्कार व एकूण २९ महानगरपालिका आयुक्त पुरस्कार परिचारिकांना प्रदान करण्यात आले.या वेळी महिला व बाल कल्याण समिती अध्यक्षा स्मिता गावकर, सार्वजनिक आरोग्य समिती अध्यक्षा डॉ. अर्चना भालेराव, नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल आणि कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. पद्मजा केसकर उपस्थित होते. हेमांगी वरळीकर म्हणाल्या, रुग्ण रुग्णालयात आल्यानंतर त्याची आपण हसतमुख होऊन करीत असलेली शुश्रूषा ही मोठी गोष्ट असून या परिचारिकांनी कधीच आजारी पडू नये अशी प्रार्थना करीत असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. अर्चना भालेराव यांनी या वेळी मार्गदर्शन करताना सांगितले की, पुरस्कारप्राप्त परिचारिकांच्या कामांचा नवीन रुजू होणाºया परिचारिकांनीसुद्धा आदर्श घ्यावा. कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांनी वैद्यकीय सेवांमध्ये परिचारिकांचा वाटा महत्त्वपूर्ण असून रुग्णसेवेत त्यांचा सहभाग हा पाठीच्या कण्यासारखा असतो. पुरस्कारासाठी निवड झालेल्या प्रत्येक परिचारिकेला रोख रक्कम, प्रशस्तिपत्र व पदक देऊन सन्मानित करण्यात येते. २०१२ पासून पुरस्काराच्या रकमेत १५ हजारपर्यंत वाढ करण्यात आली असून महापौर पुरस्कार संख्येत १८ वरून २९ अशी वाढ करण्यात आली आहे.

टॅग्स :हॉस्पिटलमुंबई