मुंबई : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गोरेगाव येथील नेस्को जंबो कोविड सेंटर येथे आणखी दीड हजार रुग्णांच्या उपचारासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असून उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी नुकतेच या केंद्राला भेट देऊन आढावा घेतला.
नेस्को कोविड सेंटरला डीआर सिस्टिम व एक्सरे मशीन– सीआर सिस्टिम या यंत्रांची व्यवस्था झाल्यास रुग्णांची गैरसोय दूर होणार आहे. या पार्श्वभूमीवर कोविड सेंटरची गरज व रुग्णसेवेसाठी लवकरात लवकर या दोन्ही मशीन आमदार निधीतून देण्याचे मंत्री सुभाष देसाई यांनी स्पष्ट केले. यावेळी नेस्को कोविड केंद्राच्या प्रमुख डॉ. नीलम अंद्रादे, उपायुक्त संजोग कब्रे, सहाय्यक महापालिका आयुक्त संतोषकुमार धोंडे तसेच महापालिका अधिकारी व अभियंता उपस्थित होते. यावेळी डॉ. नीलम अंद्रादे यांनी रुग्णांचा औषधोपचार, प्रवेश, जेवण व साफसफाई तसेच ऑक्सिजन व इतर औषधांचा पुरवठा याबाबत माहिती दिली. तसेच रुग्णांच्या रक्त तपासणीबाबत थायरोकेअर चाचणी केंद्राशी झालेला करार याबाबत माहिती दिली.
मुंबईतील रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे नेस्को संकुलात वाढीव १५०० बेड्स कार्यान्वित करण्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. यापैकी ५०० बेड्स ऑक्सिजन सुविधेसह सुसज्ज असतील. १५ एप्रिलपासून सर्व बेड्स कार्यान्वित करण्याचे आश्वासन महापालिका अधिकाऱ्यांनी दिले. सध्या उपलब्ध असलेल्या २९०० खाटांसह एकूण ४३०० रुग्णांची या एकाच संकुलात सोय होऊ शकेल. रेमेडेसिविर औषधाचा पुरेसा साठा असून अधिक सुमारे एक हजार व्हायल्स आजच उपलब्ध होत आहेत तर पुरेसा ऑक्सिजन जम्बो सिलिंडर व आयनॉक्स टाक्यांमध्येही उपलब्ध आहे. डॉक्टर, नर्सेस व वॉर्डबॉय नेमले असून या आठवड्यात अधिक भर पडणार आहे. अतिदक्षता विभागातील सुविधाही वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला.