Join us  

छेडछाडप्रकरणी नेस वाडियांचा जबाब लवकरच - प्रीती झिंटाने केली होती तक्रार

By admin | Published: April 21, 2016 4:37 AM

छेडछाड प्रकरणात उद्योगपती नेस वाडिया यांचा जबाब लवकरच घेण्यात येणार आहे. नेस वाडिया यांची एकेकाळची मैत्रीण प्रीती झिंटा हिने २०१४ मध्ये त्यांच्याविरुद्ध छेडछाडीची तक्रार दिली होती

डिप्पी वांकाणी,  मुंबईछेडछाड प्रकरणात उद्योगपती नेस वाडिया यांचा जबाब लवकरच घेण्यात येणार आहे. नेस वाडिया यांची एकेकाळची मैत्रीण प्रीती झिंटा हिने २०१४ मध्ये त्यांच्याविरुद्ध छेडछाडीची तक्रार दिली होती. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, यासाठी याच आठवड्यात समन्स पाठविण्यात येणार आहे. प्रीती झिंटाकडून करण्यात आलेल्या या तक्रारीनंतर गत दोन वर्षांत या दोघांत अनेक आरोप-प्रत्यारोप झाले आहेत. छेडछाडीच्या या प्रकरणात आरोपीचा जबाब घेण्यासाठी मोठा कालावधी लागला असल्याचे मत सूत्रांकडून व्यक्त होत आहे. हे प्रकरण हाय प्रोफाईल व्यक्तीशी संंबंधित असल्याने आतापर्यंतचा तपास संथपणे सुरू होता, असे मत व्यक्त करून सूत्रांनी सांगितले की, नुकत्याच झालेल्या बैठकीत हे प्रकरण तडीस लावण्याचा निर्णय झाला आहे. १२ जून २०१४ रोजी प्रीती झिंटाने नेस वाडिया यांच्याविरुद्ध तक्रार दिली होती की, वानखेडे स्टेडियमवरील सामन्यादरम्यान ३० मे रोजी त्यांनी आपल्याला शिवीगाळ करून धमकी दिली. पोलिसांनी नेस वाडियांविरुद्ध तक्रार दाखल केली होती, तर वाडिया यांनी आरोप केला होता की, याच सामन्यादरम्यान आसन व्यवस्थेच्या कारणावरून प्रीती हिने आपल्या आईशी गैरवर्तन केले होते. वाडिया यांनी त्या नऊ जणांची यादीही दिली होती, जे या सामन्यादरम्यान तेथे हजर होते. यात सेरिका लाल, लोरेटा जोसेफ, पूजा दादलानी, अ‍ॅनिलीन अदमास आणि फराह यांचा समावेश आहे. नेस वाडिया यांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप प्रीती हिने केला होता. आपल्या उजव्या हाताला जखम झाल्याची चार छायाचित्रेही तिने सादर केली होती. किंग्ज इलेव्हन संघाची भागीदारी खरेदी करण्यासाठी आपण कशाप्रकारे रक्कम दिली होती आणि ही रक्कम वाडिया यांनी दोन महिन्यांनी परत केली याबाबतचा खुलासाही प्रीतीने फेसबुकवर केला होता. अर्थात पैशांचा मुद्दाच नाही आणि त्यासाठी आपण तक्रार केली नव्हती, असेही तिने सांगितले होते. ही तक्रार दिल्यानंतरचा आपला अमेरिका दौरा वैयक्तिक कामासाठी होता, असा खुलासाही तिने केला होता.