Join us

सोशल मीडियामुळे आरोपी जाळ्यात

By admin | Published: January 31, 2015 2:27 AM

दोन वर्षांपूर्वी बनावट कागदपत्रांच्या आधारे बँकेला ९ लाख ६२ हजारांची फसवणूक करणा-या आरोपीला सोशल मीडियाच्या माध्यमातून अटक करण्यात खारघर पोलीसांना यश

पनवेल : दोन वर्षांपूर्वी बनावट कागदपत्रांच्या आधारे बँकेला ९ लाख ६२ हजारांची फसवणूक करणा-या आरोपीला सोशल मीडियाच्या माध्यमातून अटक करण्यात खारघर पोलीसांना यश आले आहे. प्रकरणाचा तपास लागणे कठिण असल्याने फाइल बंद करण्याची शिफारस केलेली असतानाही सहाय्यक पोलीस आयुक्त शेषराव सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अबू जाधव यांनी सोशल मीडियातून तपास करत आरोपीचा मागोवा घेतला. फेब्रुवारी २०१३ साली खारघरमधील इको बँकेकडून दोघाजणांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे गाडी खरेदी करण्याच्या बहाण्याने ९ लाख ६२ हजारांचे कर्ज घेतले, मात्र कर्ज घेतल्यानंतर त्यांनी गाडी खरेदी केलीच नाही व कर्जाचा एकही हप्ता भरला नसल्याने बँकेने खारघर पोलीसांत गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास करणारे खारघर पोलीस ठाण्याचे तत्कालीन अधिकारी एस. एम. जाधव यांनी तपासाला कोणतीच गती न देता आरोपीचा तपास लागणे कठीण असल्याचे सांगत संबधित फाइल बंद करण्याची शिफारस सहाय्यक पोलीस आयुक्त पनवेल यांच्याकडे केली होती, मात्र सहाय्यक पोलीस आयुक्त शेषराव सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अबू जाधव यांनी या प्रकरणाचा तपास करीत सोशल मीडियाच्या माध्यमातून आरोपीचा शोध घेतला. यावेळी या प्रकरणातील आरोपी गेल वेस्ट ही महिला फेसबुकवर आढळून आली. यावेळी सापळा रचून गेल वेस्ट व गौरव मेहता या दोघा आरोपींना बोरीवली येथून अटक केली. याप्रकरणात ज्या शोरूमच्या नावाने कर्ज घेऊन धनादेश काढण्यात आला होता, त्या साई वर्ल्ड मोटार या बनावट शोरूमचे मालक असलेल्या विजय पाचिमसंग ठाकूर याला दोन वर्षापूर्वीच अटक केली.तर मुख्य आरोपी फरार होता. अशाप्रकारच्या अनेक प्रकरणांचा तपास सुरु असून त्या गुन्ह्यांची उकल लवकरच केली जाईल, अशी प्रतिक्रि सुर्यवंशी यांनी दिली. (प्रतिनिधी)