मुंबई : वाळकेश्वर समुद्रात पर्सेसिन जाळीचा वापर करून मासेमारी करणारी बोट स्थानिक कोळी बांधवांनी पकडली. सोमवारी रात्री पकडलेल्या बोटीवर मंगळवारी शासनाच्या मत्स्य विभागाने महाराष्ट्र सागरी मासेमारी अधिनियम १९८१ खाली कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.याबाबत मच्छीमार संघटनेचे नेते रवींद्र पांचाळ यांनी सांगितले की, मच्छीमार नगरमधील ५ ते ६ बोटी नेहमीप्रमाणे मासेमारीसाठी सोमवारी रात्री वाळकेश्वर येथे गेल्या होत्या. त्या वेळी पर्सेसिन जाळीचा वापर करून एक बोट मासेमारी करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. बोटीची झडती घेतली असता त्यावर तारली जातीचे मासे आढळले. या जाळ्याच्या मदतीने मासेमारी केल्याने स्थानिक कोळी बांधवांचा महिन्याभराचा रोजगार मुकणार असल्याचे पांचाळ यांनी सांगितले.दरम्यान, मत्स्य विभागाच्या काही अधिकाऱ्यांना बोलावून संबंधित बोटीवर कारवाई करण्याची मागणी स्थानिक मच्छीमारांनी केली. त्या वेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी पंचनामा केला असता संबंधित बोट चालकाकडे पर्सेसिन जाळ्याने मासेमारी करण्याचा परवानाच नसल्याची धक्कादायक बाब उघड झाली. मंगळवारी अधिकाऱ्यांनी बोटीचा पंचनामा केला असून त्याचे प्रतिवेदन बुधवारी निवासी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करणार असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. त्यानंतर स्थानिक मच्छीमारांचे जबाब नोंदवून दंडात्मक कारवाई होण्याची शक्यता त्या अधिकाऱ्याने व्यक्त केली आहे. सध्या तरी पर्सेसिन जाळ्यांच्या बोटींनी समुद्राच्या कोणत्या भागात मासेमारी करावी, या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात प्रकरण सुरू असल्याचे मच्छीमार नेते दामोदर तांडेल यांनी सांगितले. तांडेल म्हणाले की, पर्सेसिन जाळ्यामुळे कित्येक टन मासे एकाचवेळी पकडले जातात. परिणामी स्थानिक मच्छीमार उध्वस्त होण्याची शक्यता आहे. तरी बुधवारी बोटीवरील माशांचा ससून डॉक येथे लिलाव होणार आहे. आयुक्त कार्यालयाने पर्सेसिन जाळ्याच्या मदतीने किनाऱ्यावर मासेमारी करणाऱ्या बोटींवर कारवाई केली नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)
वाळकेश्वर येथे पकडली पर्सेसिन जाळ्याची बोट
By admin | Published: April 29, 2015 1:06 AM