मुंबई - नेट व पेट परीक्षा एकाच दिवशी असल्याने, पेट परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थ्यांसह आंबेडकर स्टुडन्ट्स असोसिएशने मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंकडे केली आहे. नेट व पेट परीक्षा देणारे विद्यार्थी एकच असून, दोन्ही परीक्षा एकाच दिवशी आल्याने विद्यार्थ्यांची तारांबळ उडण्याची शक्यता संघटनेने व्यक्त केली आहे.संघटनेचे अध्यक्ष सचिन यांनी सांगितले की, नेट (राष्टÑीय पात्रता परीक्षा) व पेट (कला, वाणिज्य, विज्ञान, विधि आणि अभियांत्रिकी शाखेतील पीएच.डी पूर्वपरीक्षा) देणारे विद्यार्थी हे एकच असूनही दोन्ही परीक्षांचे आयोजन १६ डिसेंबरला करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होणार आहे. नेटची परीक्षा आधीच जाहीर झाल्याने, मुंबई विद्यापीठाने पेट परीक्षा वेगळ्या तारखेला ठेवणे अपेक्षित होते, असे मत सचिन यांनी व्यक्त केले.गेल्या काही दिवसांपासून मुंबई विद्यापीठाला परीक्षा सातत्याने पुढे ढकलाव्या लागत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. नव्या कुलगुरूंमुळे विद्यापीठात परिवर्तन होईल, अशी अपेक्षा विद्यार्थ्यांनी व्यक्त केली होती. मात्र, मागील काही घटना पाहता, हे कुलगुरूही या आधीच्या कुलगुरूंचाच कित्ता गिरवत असल्याची विद्यार्थ्यांची खात्री झाल्याचा आरोप संघटनेने केला आहे.विद्यार्थ्यांना तयारी करणे अवघडदोन्ही परीक्षा एकाच दिवशी आल्याने परीक्षेची तयारी करणे विद्यार्थ्यांसाठी अवघड झाले आहे. राजकीय वजनातून पदे वाटल्याने विद्यार्थ्यांना त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचा संघटनेचा आरोप आहे. त्यामुळेच कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी पेटची परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी संघटनेसह विद्यार्थ्यांकडून होत आहे.
नेट, पेट परीक्षा एकाच दिवशी, विद्यार्थ्यांची पंचाईत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2018 6:37 AM