उधाणलेल्या दर्यातून ४१० लोकांची सुटका; ९३ जणांचा शोध सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा बाॅम्बे हाय परिसरातील तेलविहिरींसाठी काम करणाऱ्या विविध नौका आणि व्यापारी तराफ्यांना बसला आहे. अत्यंत खराब हवामानामुळे भरकटलेल्या नौकांतील ४१० लोकांची सुटका करण्यात मदत आणि बचावपथकांना यश आले, तर अद्याप ९३ लोकांचा शोध सुरू आहे.
तौक्ते चक्रीवादळामुळे अरबी समुद्रातील बार्ज आणि विविध नौकांवर अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी भारतीय नौदल, तटरक्षक दल, ओएनजीसीसह विविध यंत्रणांकडून शोध व बचाव मोहीम सुरू आहे. भारतीय नौदलाच्या आयएनएस कोची आणि कोलकाता या युद्धनौकांच्या साथीने बियास, बेतवा आणि तेग या जहाजांनी मुंबईपासून ३५ सागरी मैल अंतरावर बुडालेल्या पी-३०५ या या नौकेवर अडकलेल्या २७३ जणांच्या सुटकेची मोहीम हाती घेतली. दोन दिवसांच्या शोधकार्यात आतापर्यंत १८० जणांची सुखरूप सुटका केली. ही नौका साेमवारी (दि. १७) समुद्रात बुडाली असून अद्याप ९३ जणांचा शोध सुरू आहे.
दुसऱ्या एका मोहिमेत, गॅल कन्स्ट्रक्टर या नौकेवरील १८० जणांची सुटका करण्यात भारतीय नौदल आणि तटरक्षक दलाच्या पथकांना यश आले. याशिवाय, गुजरातच्या पिपावाव किनाऱ्यापासून आग्नेयेस १५ ते २० सागरी मैलांवर असलेल्या सपोर्ट स्टेशन-३, ग्रेट शिप अदिती आणि ड्रिल शिप सागरभूषण या जहाजांसाठीही आयएनएस तलवार या युद्धनौकेच्या नेतृत्वाखाली शाेध व बचावकार्य सुरू आहे.
......................................