मुंबई : २६/११च्या दहशतवादी हल्ल्यातील मृतांना इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ताज हॉटेलमधील स्मृतिस्थळाजवळ पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. दहशतवादी हल्ल्यात हॉटेल ताजमधील वास्तव्यास असलेले नागरिक, कर्मचारी, सुरक्षा दलाचे जवान मृत्युमुखी पडले होते. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हॉटेल ताजमध्ये छोटेखानी स्मारक उभारण्यात आले आहे. या स्मारकावर मृतांची नावे कोरण्यात आली आहेत. नेतान्याहू व फडणवीस या दोघांनी पुष्पचक्र अर्पण करून मृतांना श्रद्धांजली अर्पण केली. या वेळी नेतान्याहू यांनी संदेशवहीत आपला संदेशदेखील नोंदविला.दरम्यान, भारत दौºयावर आलेल्या इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्याविरोधात मुंबईत ठिकठिकाणी ‘गो बॅक’च्या घोषणा देण्यात आल्या. फिलिस्तानमधील जेरुसलेमचा ताबा सोडण्याची मागणी करत इस्रायलकडून सुरू असलेल्या दहशतवादाविरोधात इंडिया पॅलेस्टाइन सॉलिडॅरिटी फोरमने गुरुवारी आझाद मैदानात नेतान्याहू यांचा निषेध केला. पॅलेस्टाइनमध्ये दहशतवाद माजवणाºया आणि आंतरराष्ट्रीय कायदे व नियमांची पायमल्ली करणाºया नेतान्याहू यांनी भारतातून चालते व्हावे, अशा घोषणा आझाद मैदानात घुमल्या.भाकपचे मुंबई सचिव प्रकाश रेड्डी यांनी इंडो-इस्रायल व्यापारी चेंबर्सवर निशाणा साधला आहे. भाजपा व व्यापारी संघाने ‘काळा घोडा चौका’चे नामकरण ‘पेरेस चौक’ म्हणून करायचे ठरवले आहे, त्याला सीपीआय व फोरमचा विरोध आहे.इंडिया पॅलेस्टाइन सॉलिडॅरिटी फोरमचे निमंत्रक फिरोज मिठीबोरवाला यांनी सांगितले की, अमेरिकेला हाताशी घेऊन इस्रायलने जेरुसलेमवर कब्जा करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याविरोधात संयुक्त राष्ट्र संघाच्या बैठकीत १२८ देशांनी या प्रस्तावाला विरोध दर्शवला आहे. तरीही इस्रायलचे पंतप्रधान जेरुसलेमचा ताबा सोडण्यास तयार नाहीत. याउलट लष्करी सामर्थ्याच्या बळावर गाझा पट्टीवर सतत अंदाधुंद गोळीबार करून पॅलेस्टाइनच्या निष्पाप जनतेचा बळी घेतला जात आहे. अशा दहशतवादास खतपाणी घालणाºया पंतप्रधानांना भारतासारख्या लोकशाही देशाने पायघड्या घालणे निषेधार्ह आहे. त्याचाच निषेध फोरमतर्फे करत आहोत.नेतान्याहूंनी घेतली चिमकुल्या ‘मोशे’ची भेटमुंबईवरील २६/११च्या दहशतवादी हल्ल्यातून बचावलेला इस्रायली चिमुकला मोशे हॉल्जबर्ग याची इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी गुरुवारी भेट घेतली. दहशतवाद्यांनी हल्ला घडवून आणलेल्या नरिमन हाउस येथे ही भेट झाली. तेथे नेतान्याहू यांनी मोशेची गळाभेटही घेतली. मोशेच्या आजोबांनी भारतात येऊन आपल्याला आनंद वाटत असल्याचे म्हटले; तसेच आता आम्ही भारतात जास्त सुरक्षित आहोत, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.सुरक्षेसाठी कडेकोट बंदोबस्तइस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या सुरक्षेसाठी मुंबईत कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. बुधवारी पहाटेपासूनच मुंबईतील रस्त्यांवर गस्त वाढविण्यात आली होती. तसेच गुरुवारी त्यांच्या आगमनापूर्वी सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर ताज, नरिमन हाउस परिसरातील सर्व दुकानांची झाडाझडती घेण्यात आली. बॉम्बशोधक पथकानेही परिसर पिंजून काढला. पोलीस नियंत्रण कक्षातील कर्मचारी सीसीटीव्हीच्या माध्यमांतून प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवून होते. तसेच ठिकठिकाणी नाकाबंदीदरम्यान वाहनचालकांची कसून चौकशी सुरू होती. मुंबईतल्या प्रत्येक पोलीस ठाण्यातील कर्मचारी त्यांच्या सुरक्षेसाठी आपापल्या विभागांतील प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवून होते.रझा अकादमीची निदर्शनेनागपाडा येथील मदनपुरा चौकात रझा अकादमीतर्फे नेतान्याहू यांच्याविरोधात निदर्शने करण्यात आली. अमेरिका आणि इस्रायलकडून पॅलेस्टाइनविरोधात सुरू असलेल्या दहशतवादाचा निषेध या वेळी करण्यात आला; शिवाय अमेरिकेच्या वस्तूंवर मुस्लीम समाजाकडून बहिष्कार घालण्याचे आवाहन रझा अकादमीने केले आहे.
नेतान्याहू यांची दहशतवादी हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 2:09 AM