मुंबई :
‘नेटफ्लिक्स’ रिचार्जच्या नावाखाली वरळी परिसरात राहणाऱ्या ४४ वर्षीय त्वचारोग तज्ज्ञ महिला डॉक्टरची एक लाख ४९ हजार ९८८ रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.
महिला डॉक्टरच्या तक्रारीनुसार, २४ ऑक्टोबरला त्यांनी वांद्रे येथे क्लिनिकमध्ये असताना क्रेडिट कार्डद्वारे ‘नेटफ्लिक्स’ रिचार्ज करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांनी त्यांच्या बँकेचे ॲप उघडून डोमेस्टिक व इंटरनॅशनल ट्रॅन्झेक्शन ऑन केले. मात्र लगेचच त्यांच्या खात्यातून एक लाख ४९ हजार ९८८ रुपये काढण्यात आल्याचा मेसेज त्यांना आला. याबाबतची माहिती त्यांनी त्यांच्या बँकेला कळवली. तसेच सायबर हेल्पलाइनवरही त्यांनी तक्रार दिली. वांद्रे पोलिसांनी याप्रकरणी बीएनएस कायद्याचे कलम ३१८(४) व माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६(ड) अंतर्गत अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल केला.