Join us  

नेदरलँड्स आणि फ्रान्समधील फुले मुंबईत बघा !

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2024 9:52 AM

महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि महाराष्ट्र निसर्ग संस्था उद्यान यांचे आयोजन.

मुंबई : नेदरलँड्स आणि फ्रान्समधील विविध प्रकारची ट्युलिप, पिवळी लिली, हायड्रेजिया, ऑर्किड, बटन शेवंती तसेच सुगंधी गुलाबपुष्पे जसे पापामिलम, परफ्युम डिलाइट,  दुहेरी डिलाइट या प्रजाती महाराष्ट्र निसर्ग संस्था उद्यानात पाहण्यास मिळणार आहेत. निमित्त आहे ते मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि महाराष्ट्र निसर्ग संस्था उद्यान यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र निसर्ग उद्यान, धारावी येथे आयोजित करण्यात आलेल्या झाडे, फुले व औषधी वनस्पतींच्या प्रदर्शनाचे. १७ व १८ फेब्रुवारी रोजी सकाळी ८:३० ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत प्रदर्शन खुले राहणार आहे.

 कुंड्यांमध्ये वाढविलेली शोभिवंत व फुलझाडे, फळभाज्यांची झाडे, मोसमी फूलझाडे, औषधी वनस्पती, बोन्साय तसेच कृष्णवडासारख्या अनेक दुर्मीळ देशी प्रजातींची झाडे प्रदर्शनात बघता येणार आहेत. 

 विविध प्रकारच्या कुंड्यांतील फूलझाडांनी तयार केलेल्या प्रतिकृती पाहावयास मिळणार आहेत. 

 शोभिवंत झाडे, हंगामी फूलझाडे, औषधी वनस्पती आणि गुलाबांच्या विविध प्रजातींची विविधता एकाच ठिकाणी मुंबईमधील जनतेला पाहावयास मिळाव्यात आणि जनतेमध्ये निसर्गाची आवड निर्माण व्हावी, हे मुख्य उद्देश प्रदर्शनाच्या आयोजनामागे आहे.

 एकूण १२ हजारांपेक्षा अधिक कुंड्यांतील झाडांचा समावेश या प्रदर्शनात करण्यात आला आहे.

विविध पक्ष्यांच्या प्रजातींचे आश्रयस्थान आणि अनेक वृक्षांनी समृद्ध बनलेल्या उद्यानांत निसर्ग संवर्धनाबाबत महत्त्व समजावून त्याबाबत जनजागृती करण्यासाठी एमएमआरडीएचा हा प्रयत्न आहे. प्रदर्शन पाहायला येणाऱ्यांना सभोवतालच्या निसर्गाचे संवर्धन आणि संरक्षण करण्यास प्रेरित करील.- डॉ. संजय मुखर्जी, महानगर आयुक्त, एमएमआरडीए

टॅग्स :मुंबईफुलंएमएमआरडीए