नेटीझन्स फेस्ट! सोशल मीडियावरही दिसला रक्षाबंधनाचा उत्साह
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2018 05:31 AM2018-08-27T05:31:36+5:302018-08-27T05:32:17+5:30
मुंबई : बहीण-भावाच्या नात्याला उजाळा देण्यासह हे नाते अतूट राखण्यासाठी रक्षाबंधन साजरा करण्यात आला. रविवारी उत्साहात रक्षाबंधन सर्वत्र करण्यात आले. मुंबई शहर आणि उपनगरात यानिमित्ताने ठिकठिकाणी गर्दी होती. मात्र या गर्दीत ज्या बहीण आणि भावांना भेटता आले नाही, त्यांनी सोशल मीडियाचा आधार घेत रक्षाबंधन साजरा केला. व्हिडीओ कॉल करून बहिणीने भावाला ओवाळले आणि याच सोशल मीडियाच्या आधारे भावाने स्वत:च राखी बांधत आपले प्रेम व्यक्त केले.
बहीण-भावाचे रक्षाबंधनाचे फोटो सोशल मीडियावर सकाळपासूनच अपलोड होण्यास सुरुवात झाली. फेसबुकवरून रक्षाबंधन साजरी झाल्याचे फोटो पोस्ट करण्यात येत होते. त्यावर लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत होता. रक्षाबंधन या सणावर आधारित असलेले गाणे खूप व्हायरल होत होते. यात ‘बहनाने भाई की कलाई से प्यार बांधा’, ‘भय्या मेरे राखी के बंधन को निभाना’, ‘फूलों का तारों का सबका कहना है’, ‘इसे समझो न रेशम का तार भय्या’ या गाण्याचा वापर करून व्हॉट्सअॅपवर स्टेटस ठेवले जात होते. फेसबुकवर टिष्ट्वटरवरून #राखी, #रक्षाबंधन, #हॅप्पी रक्षाबंधन असे हॅशटॅग वापरून फोटो व्हायरल करण्यात आले. बहिणीविषयीचे गोड शब्द सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट करण्यात आले. यात ‘मायेचे साजूक तूप, आईचे दुसरे रूप, काळजीरूपी धाक, प्रेमळ तिची हाक, कधी बचावाची ढाल, कधी मायेची ऊबदार शाल’ अशी रक्षाबंधनाची शुभेच्छापर वाक्ये पोस्ट करण्यात येत होती.
कोळी बांधवांकडून नारळी पौर्णिमा मोठ्या उत्साहात पार पडली. या वेळी नारळी पौर्णिमा आणि राखी पौर्णिमा साजरी करण्यात आली. सोशल मीडियावरून कोळी वेशभूषा परिधान केलेले फोटो युजर्सकडून पोस्ट करण्यात येत होते. व्हॉट्सअॅप स्टेटसवर कोळीगीते पोस्ट करण्यात येत होती.