शबाना आझमींची मदत करणाऱ्या जवानाला नेटीझन्सचा कडक सॅल्यूट
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2020 05:56 PM2020-01-19T17:56:52+5:302020-01-19T17:58:11+5:30
शबाना आझमींच्या अपघाताचे फोटो पाहून सर्वांनाच धक्का बसला.
मुंबई - बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी शनिवारी दुपारी कार अपघातात जखमी झाल्या. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खालापूर टोलनाक्याजवळ हा अपघात घडला. या अपघातात त्यांच्या कारचा चालक आणि त्या जखमी झाल्या असून दोघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. या अपघाताचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यासोबत, सैन्यातील एका जवानाचेही फोटो सोशल मीडियावर शेअर झाले आहेत. शबाना यांना उचलण्यासाठी जवानाची धडपड या फोटोत दिसत आहे.
शबाना आझमींच्या अपघाताचे फोटो पाहून सर्वांनाच धक्का बसला. शबाना आझमींचे पती जावेद अख्तर याच गाडीतून प्रवास करत होते, मात्र, त्यांना या अपघातात साधे खरचटलेही नाही, असे सांगण्यात आले. पण सत्य मात्र काही वेगळेच आहे. होय, प्रत्यक्षात जावेद अख्तर अपघातग्रस्त कारमध्ये नव्हतेच. ते दुसऱ्या कारमधून प्रवास करत होते. त्यामुळे ते अपघातातून बचावले. मात्र, या अपघातानंतर जावेद अख्तर यांच्यासह स्थानिक शबाना यांच्या मदतीसाठी पुढे सरसावले. त्याचवेळी, सैन्यातील एक जवानही शबाना आझमींच्या मदतीसाठी धावल. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यापर्यंत या जवानाने सेवी दिली. त्यामुळे, या जवानाचेही नेटीझन्सकडून कौतुक होत आहे. सोशल मीडियावर या जवानाचे फोटो व्हायरल होत असून त्यांस कडक सॅल्युट करण्यात येत आहे.
#ShabanaAzmi being taken for treatment by the same army man whom she abuses on a daily basis 👇🏼👇🏼👇🏼 pic.twitter.com/n3NjCgcRVl
— @Tᴜsʜᴀʀ Sʜᴜᴋʟᴀ𝟶𝟶𝟷 (@001___________) January 18, 2020
शबाना आजमींच्या मदतीसाठी अखेर भारतीय जवान पुढे आला अशा प्रकारच्या प्रतिक्रिया नेटीझन्स देत आहेत. शबाना यांनी अनेकदा सरकारविरोधात आपलं मत व्यक्त केलंय. मात्र, सैन्याबद्दल कधीही आक्षेपार्ह बोलल्या नाहीत. तरीही, जवानच त्यांच्या मदतीला आला, असे म्हणत शबाना यांच्यावर काही जणांकडून उपहासात्मक पोस्ट करण्यात आल्या. तर, या जवानाचं कौतुकही केलं गेलंय.
दरम्यान, शबाना यांच्यावर सध्या मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.