रेल्वेच्या मोफत इंटरनेटमुळे नेटिझन्सचे ‘कल्याण’
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2018 01:11 AM2018-07-30T01:11:21+5:302018-07-30T01:11:38+5:30
रेल्वे स्थानकांवर मोफत वायफाय सेवा सुरु झाल्यानंतर अल्पावधीत याचा लाभ घेण्यासाठी नेटिझन्सची एकच चढाओढ सुरु आहे. मुंबईतील रेल्वे स्थानकांवर विनाशुल्क इंटरनेट सेवेचा लाभ घेणाऱ्या स्थानकात कल्याण स्थानकाने बाजी मारली आहे.
- महेश चेमटे
मुंबई : रेल्वे स्थानकांवर मोफत वायफाय सेवा सुरु झाल्यानंतर अल्पावधीत याचा लाभ घेण्यासाठी नेटिझन्सची एकच चढाओढ सुरु
आहे. मुंबईतील रेल्वे स्थानकांवर विनाशुल्क इंटरनेट सेवेचा लाभ घेणाऱ्या स्थानकात कल्याण स्थानकाने बाजी मारली आहे.
कल्याण स्थानकात जूून २०१८ मध्ये दर दिवशी सरासरी १४ हजारांहून
जास्त प्रवासी कनेक्ट होत आहे. ठाणे स्थानकात दर दिवशी सरासरी
१२ हजारांहून जास्त,
दादर स्थानकातसुमारे ११ हजारांहून जास्त प्रवासी या सेवेचा वापर करत आहेत.
मुंबईतील कल्याण जंक्शन हे मेल-एक्सप्रेससह लोकलच्या दृष्टीने महत्त्वाचे स्थानक आहे. जून महिन्याच्या आकडेवारीनूसार कल्याण स्थानकाने इंटरनेट वापरकर्त्यांमध्ये अग्रक्रम पटकावला. कल्याण स्थानकात दर दिवशी सरासरी १४ हजारांहून जास्त प्रवासी मोफत इंटरनेटमुळे आॅनलाईन असतात. एक प्रवासी सरासरी २०२ एमबी डाटा वापरतो. तर ठाणे स्थानकात दर दिवशी सरासरी १२ हजारांहून अधिक प्रवाशांकडून सरासरी १६७ एमबी डाटा वापरण्यात येतो. दादर स्थानकात दर दिवशी सुमारे ११ हजारांपेक्षा जास्त प्रवासी सरासरी २०० एमबी वापर करत आहेत.
केंद्र सरकारच्या ‘डिजिटल इंडिया’ उपक्रमातंर्गत रेल्वे स्थानकांवर पहिल्या टप्प्यांतर्गत ४०० स्थानकांवर मोफत वाय-फाय सुरु करण्याची घोषणा करण्यात आली. गुगल आणि दूरसंचार खात्याच्या रेलटेल कंपनीने एकत्र येत ‘रेलवायर’ ची निर्मिती करत जानेवारी २०१६ मध्ये मुंबई सेंट्रल स्थानकातून मोफत इंटरनेट सुविधेचा श्रीगणेशा केला.
महाराष्ट्रातील ५० रेल्वे स्थानकांवर मोफत इंटरनेट सेवा सुरु झाली आहे. लवकरच गोंदिया,जळगाव, नाशिक रोड, जालना आणि अमरावती स्थानकांवर देखील मोफत इंटरनेट सुविधा सुरु होईल. सद्यस्थितीत देशभरातील ७०० पेक्षा जास्त स्थानकावर मोफत वायफाय सुविधा सुरु आहे. यात मुंबईतील ‘ए १’ आणि ‘ए’ या स्थानकांसह बहुतांशी स्थानकांचा समावेश आहे.
जानेवारी २०१६ :
मुंबई सेंट्रल स्थानकातून सुरुवात
२०१६-१७ : १०० रेल्वे स्थानके पूर्ण
२०१७-१८ : २०० रेल्वे स्थानके पूर्ण
२०१८-१९ : ५०० रेल्वे स्थानक पूर्ण
मोमेंट आॅफ प्राईड...
२७ विद्यार्थ्यांचे जेईई परीक्षेत यश
२०१८ साली स्थानकांवरील मोफत वायफायच्या जोरावर देहरादून येथील एकूण २७ विद्यार्थ्यांनी काठिण्यची उच्चतम पातळीची असलेली जेईई परीक्षा उत्तीर्ण केली.
- अधिकृत व्टिटर अकाऊंट, रेलटेल
प्रवासी संख्येनुसार
चढ-उतार
स्थानकातील प्रवासी संख्येनूसार रोज इंटरनेट ‘अॅक्टिव्ह’ वापरकर्त्यांमध्ये चढ-उतार येतो. परिणामी सरासरीमध्ये कल्याण स्थानकातील प्रवासी सर्वाधिक इंटरनेट सेवेचा लाभ घेत असल्याचे दिसून येत आहे.
- अधिकृत प्रवक्ता, रेलटेल
८० लाख अॅक्टिव्ह वापरकर्ते
जून २०१८ मध्ये एकूण ७०७ रेल्वे स्थानकांवर मोफत वाय-फाय सेवा सुरु झाली. यामुळे एका महिन्यात तब्बल ८० लाख अॅक्टिव्ह वापरकर्त्यांकडून ७ हजारपेक्षा जास्त टेराबाईट इंटरनेट डाटा वापरला जातो.
- अधिकृत व्टिटर अकाऊंट, रेलटेल